मुली, आईच्या खात्यात लाभ
शासनाने यापूर्वी पूर्वी मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी असलेली माझी कन्या भाग्यश्री ही योजना आता लेक लाडकी या योजनेत बदलली आहे. या योजने अंतर्गत मुलींचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता मुलगी आणि आई यांच्या संयुक्त खात्यावर जमा करण्यात येतो. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता असे असे एकूण १ लाख १ हजार रुपये मुलींच्या खात्यांवर जमा करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून ज्या पालकांनी आपल्या मुलींच्या नावाची नोंदणी महिला बालविकास विभागाकडे केली आणि सर्व प्रमाणपत्राची पूर्तता केलेल्या तालुक्यातील ५४ लाभार्थ्यांना ५४ लाख रुपये मिळणार आहे.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी योजना
राज्यात एक एप्रिल २०२३ पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत १ लाख १ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे तसेच बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे.
असा आहे लाभ
– पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, ११ वीत गेल्यावर आठ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये.
– १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक किंवा दोन मुलींना; त्याचप्रमाणे एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ.
– दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.
अर्ज करणे अनिवार्य
पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. अंगणवाडी सेविकेकडे अर्ज करून पोहोच पावती घ्यावी लागणार आहे. कागदपत्र, अर्ज तपासणी केल्यानंतर नोंदणी ऑनलाइन पोर्टलवर करून अर्ज संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यावा.
अत्यावश्यक कागदपत्रे
लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, लाभार्थ्याचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशनकार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत, मतदान ओळखपत्र, शाळेचा दाखला
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
तालुक्यात या योजनेसाठी ५४ लाभार्थी सध्या पात्र आहेत. मार्चमध्ये तालुक्यातील अहवाल वरिष्ठांना पाठवला होता. सर्व प्रकारच्या तपासण्या झाल्यानंतर जून महिन्यात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला पाच हजारांचा हप्ता सदरील लाभार्थी यांना मिळाला आहे. या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पात्र लाभार्थी शोधण्यात येत आहे.
– विनोद हटकर, प्रकल्प अधिकारी, महिला व बालविकास विभाग, फुलंब्री