भारतातील लोकशाही व्यवस्था टिकवायची असेल तर येथील हिंदू बहुसंख्य असायला हवेत. ते अल्पसंख्य झाल्यास लोकशाही संपेल, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) गुरुवारी मांडली. तसेच प्रत्येक हिंदूने किमान दोन अपत्ये जन्माला घालायला हवीत, असेदेखील आवाहन केले.
भारताचा शेजारी देशा असलेल्या बांगलादेश येथे सध्या हाहाकार माजला आहे. तेथील लोकशाही व्यवस्था धोक्यात आली आहे. संपूर्ण देशाचा कारभार लष्कराच्या हातात गेल्यागत स्थिती आहे. अशीच परिस्थिती भारतातदेखील निर्माण होऊ शकते. तसे होऊ द्यायचे नसेल तर हिंदू अल्पसंख्य व्हायला नको. मात्र, आज लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पना फोफावत आहे. लग्न करूनही अपत्य न होऊ देण्याचा ट्रेंड वाढला आहे. एकच अपत्य ठेवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास भविष्यात हिंदू अल्पसंख्य होण्याचा धोका आहे. याचा विचार प्रत्येक हिंदूने करण्याची गरज आहे, अशी भूमिका विहिंपचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी पत्रपरिषदेदरम्यान मांडली. याप्रसंगी विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे, विदर्भ प्रांत प्रचार प्रसार प्रमुख निरंजन रिसालदार, सहप्रचार प्रसार प्रमुख अमित वाजपेयी यांची उपस्थिती होती.
बांग्लादेशात हिंदूंची सुरक्षितता सुनिश्चित करावी
बांग्लादेशमध्ये सध्या हिंसेचे वातावरण आहे. तेथील पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडून गेल्यानंतरही आंदोलन थांबलेले नाही. या गोंधळयुक्त परिस्थितीत तेथील जिहादी घटकांनी हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू केले आहेत. बांग्लादेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिंदू अल्पसंख्याकांची धार्मिकस्थळे, व्यापारी प्रतिष्ठाने आणि घरांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी विहिंपद्वारे केंद्र सरकारकडे करण्यात आली. तसेच जे बांग्लादेशी हिंदू भारतात येऊ इच्छितात त्यांना येणे येऊ द्यावेत, असेदेखील विहिंपचे म्हणणे आहे.
सातत्याने झाले अत्याचार
फाळणीच्या वेळी बांगलादेशातील हिंदूंची संख्या ३२ टक्के होती, ती आता ८ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यांच्यावर सातत्याने अत्याचार झाले आहेत. तेथील पीडित अल्पसंख्यांक हिंदूंची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे, याकडेही संघटनेने सरकारचे लक्ष वेधलेले आहे.