लोकसभेला काँग्रेसनं ठाकरेंसमोर नमतं घेतलं. त्यांचे सगळे हट्ट पुरवले. सांगलीसारखी पारंपारिक जागा सोडली. पण तरीही ठाकरेंना काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या. महाविकास आघाडीत सर्वात कमी स्ट्राईक रेट ठाकरेसेनेचा राहिला. अनेक महत्त्वाच्या जागा त्यांच्या पक्षानं गमावल्या. या सगळ्याची आठवण काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंना दिल्ली दौऱ्यात करुन दिल्याचं कळतं. काँग्रेसचे दिल्ली आणि राज्यातील नेते आता ठाकरेंसमोर नमतं घेण्याच्या तयारीत नाहीत.
उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी ठाकरेसेनेकडून केली जात आहे. हा मुद्दा उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत मांडला. पण त्यांची मागणी मान्य झाली नाही. भाजपचे नेते ठाकरे कुटुंबावर सातत्यानं आरोप करत आहेत. तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर केल्यास भाजपच्या हाती आयतं कोलीत मिळेल. निवडणूक व्यक्तीकेंद्रीत होईल. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल, असं काँग्रेसकडून ठाकरेंना सांगण्यात आलं.
लोकसभेला आपण पंतप्रधानपदाचा चेहरा न देता लढलो. त्यावेळी आपल्याला चांगलं यश मिळालं, याची आठवण ठाकरेंना करुन देण्यात आली. ज्याचे जास्त आमदार निवडून येतील, त्याचा मुख्यमंत्री, असं सूत्र काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंना सांगितलं. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार वापरत असलेला पॅटर्न ठाकरेंना वापरता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलासोबत असोत वा भाजपसोबत, निवडणुकीआधीच ते मित्रपक्षांकडून मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची घोषणा करुन घेतात आणि आमदारांचा आकडा कितीही कमी असला तरी मुख्यमंत्रिपदी कायम राहतात. पण हा पॅटर्न ठाकरेंना जमलेला नाही.
जागावाटपात अधिक जागांसाठी आग्रह धरणाऱ्या ठाकरेंना काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभेतील चुकांची आठवण करुन दिली. ठाकरेंच्या हट्टामुळे काँग्रेसनं सांगलीची जागा सोडली. पण तिथे काँग्रेसचा बंडखोर निवडून आला. तर ठाकरेंचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, संभाजीनगरसारख्या जागांवर शिवसेना कमी पडली. अनेक ठिकाणी उमेदवारांची निवड योग्य नव्हती, अशा चुकांचा पाढाच काँग्रेसच्या नेत्यांनी वाचल्याचं कळतं.
रायगडची जागा ठाकरेंनी जिंकली असती तर अजित पवार गट शून्यावर आला असता. सिंधुदुर्ग-रत्नागिरीत अधिक ताकद लावली असती, तर नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना चाप बसला असता. संभाजीनगरात मराठा आरक्षणाचा असलेला जोर पाहता तिथे मराठा उमेदवार द्यायला हवा होता. हातकणंगलेमध्ये अधिक जोर लावायला हवा होता, अशी लांबलचक यादी काँग्रेसच्या नेत्यांनी वाचली.
लोकसभेला काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. शरद पवारांनी केवळ दहाच जागा लढवल्या. पण त्यातल्या ८ जागा निवडून आणल्या. काँग्रेसनं थेट लढतीत भाजपच्या उमेदवारांना पाणी पाजलं. तर शरद पवारांनी अजित पवारांना शह दिला. पण ठाकरेंचा स्ट्राईक रेट मात्र शिंदेसेनेपेक्षा कमी राहिला. या सगळ्याची आठवण करुन देत विधानसभेला काँग्रेस बॅकफूटवर येणार नसल्याचं ठाकरेंना सांगण्यात आल्याचं समजतं.
लोकसभेला अधिकच्या जागा दिल्या. पण विधानसभेला ताकदीच्या आधारे जागावाटप होईल. निवडून येण्याची शक्यता असलेल्या जागाच दिल्या जातील. काँग्रेस, राष्ट्रवादी हक्काच्या जागा सोडणार नाही. लोकसभेला केलेली तडजोड विधानसभेला होणार नाही, असा स्पष्ट संदेश काँग्रेसनं ठाकरेंना दिल्याचं समजतं. जिंकण्याची शक्यता असेल त्याच जागा घ्या अन् स्ट्राईक रेटवर लक्ष द्या, असं काँग्रेसकडून ठाकरेंना सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विधानसभेला ठाकरेंना काँग्रेससोबत जुळवून घ्यावं लागेल.