शुभम बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी जळगाव येथे आला. दर महिन्याला तीन हजार रुपये आई-वडील देऊ शकत नसल्याने त्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम केले. तेथे रात्री काम आणि सकाळी अभ्यास करायचा, असा त्याचा नित्यक्रम होता. गावात कुठेही काम नसल्याने सर्व परिवार जळगाव येथे राहायला आले आणि आई वडील एका खासगी कंपनीमध्ये कामाला जाऊ लागले. करोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये कंपनी बंद पडली आणि परत सर्व गावाकडे आले. त्यानंतर वडिलांना करोना झाला त्यानंतर पॅरालिसीसचा झटका आला.
गावात आल्यानंतर आर्थिक स्रोत पूर्णपणे बंद झाले. शुभम देखील मजुरी करण्यासाठी दुसरीकडे कामाला जाऊ लागला. आई दुसऱ्यांच्या शेतात कामाला जात होती. वडिलांना पॅरालिसिस झाल्यामुळे वडील कुठेही कामाला जाऊ शकत नव्हते. या कठीण परिस्थितीत शुभम पुन्हा जळगावला एका खासगी हॉस्पिटलमध्ये कामाला आला. तेथे त्याला सहा हजार रुपये पगार मिळायचा आणि राहण्याची सोय तेथेच हॉस्पिटलमध्ये होती. रात्री काम करायचं आणि दिवसा अभ्यास करायचं हेच शुभमचं काम होतं.
दोन वेळा परीक्षा देऊन सुद्धा शुभम एकावेळी चार मार्कांनी मागे राहिला. तर २०२१च्या परीक्षेमध्ये अवघ्या दोन मार्कांनी शुभम नापास झाला. मात्र मावस भावाने त्याला दिलेली साथ ही आयुष्यभर स्मरणात राहणारी आहे. त्यातच बहिणीचे स्वप्न होते अधिकारी बनायचे ते स्वप्न देखील शुभमने पूर्ण केलं. ”मेहनतीशिवाय यश मिळत नाही”, हेच मी यातून शिकलो. त्यामुळे तरुणांनी देखील मेहनत करत रहा. यश एक ना एक दिवस नक्कीच मिळते. यश मिळाले नाही म्हणून खचून जाण्याचे कारण नाही. असंही शुभम शिंदे याने तरुणांना सल्ला दिला. शुभमला हे यश सहजासहजी मिळालेले नाही. त्याची संघर्ष कहाणी ऐकाल तर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. खरंतर शुभमच्या बहिणीला अधिकारी व्हायचे होते. परंतू सामाजिक परिस्थिती आड आली आणि तिने भावात आपले स्वप्न बघितले.
शुभमच्या पाठीशी खंबीर उभा राहिलेल्या मावस भावानेही साथ दिली आणि शुभम PSI झाला. स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र वाटतं तेवढं सोप्प नाही. पण मेहनत करायची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही, असं शुभम सांगतो. शुभम शिंदे याच्या बहिणीने सांगितले की, ”अधिकारी होण्याचं स्वप्न माझं पण होतं. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची आणि समाजाच्या जाचक अटींमुळे मी अधिकारी होऊ शकली नाही. कारण मुलीचे १८ वय झाले की तिला लग्न करायला सांगतात. मात्र माझे दोघेही मावसभाऊ यांनी आमच्या परिवाराच्या पाठीशी राहत आम्हाला खंबीर साथ दिली आणि आज माझे जे स्वप्न होते ते माझ्या भावाने पूर्ण केलं. भावाला मी आर्थिक मदत करू शकली नाही. पण त्याच्या पाठीशी शेवटपर्यंत उभे राहण्याचे वचन मी त्याला दिले होते आणि आज ते स्वप्न त्याने पूर्ण केले”.
शुभमचे वडील म्हणाले की, ”मुलगा अधिकारी झाला याचा आनंद आहेच. कंपनीत कामाला जाऊन थोडेफार पैसे त्याला देत होतो. गावातील नागरिक देखील माझ्या मुलाचे कौतुक करत आहेत, हाच माझ्यासाठी मोठा आनंद आहे”. शुभम शिदेची आई म्हणाली की, ”मला बैठकीला जाऊन प्रेरणा मिळाली. मी त्याला पाचशे रुपये देखील मदत करु शकली नाही. पण मला पूर्ण विश्वास होता की माझा मुलगा नक्कीच अधिकारी होणार. कुठेही एक रुपया न लागता त्याच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर तो अधिकारी झाला, याचा मला खूप मोठा आनंद आहे. गरिबाचा मुलगा देखील अधिकारी होऊ शकतो हे आज आम्ही स्वतः अनुभवले. त्यामुळे मुलांनी देखील मेहनतीने आणि जिद्दीने काम करत रहा. अभ्यास करत राहा यश नक्कीच मिळते. मुंगी किती वेळा चढ-उतर करते पण ती शेवटी चढतेच. त्यामुळे ती प्रयत्न करणे सोडत नाही. म्हणून मुलांनी प्रयत्न करत राहा”, असं देखील शुभमच्या आईने तरुणांना सल्ला दिला.