महात्मा जोतिबा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. या भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी महापालिकेने आठ कोटी ६० लाख ९८ हजार रुपयांच्या निविदेला मान्यता दिली आहे. त्यामुळे या स्मारकाच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये बुधवार पेठेतील भिडे वाड्यामध्ये देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. सुमारे पावणेतीन गुंठे जागेतील भिडे वाडा मोडकळीस आला होता. तिथे स्मारक उभारण्याचा निर्णय अनेकदा घेतला गेला होता. मात्र, वाड्यातील भाडेकरूंनी न्यायालयात धाव घेतल्याने भूसंपादन रखडले होते. पण, उच्च न्यायालयाने योग्य मोबदला देऊन भूसंपादन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हेच आदेश कायम ठेवले. त्यामुळे भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर पालिकेने डिसेंबर २०२३ मध्ये तातडीने हा वाडा भुईसपाट करत जागा ताब्यात घेतली.
या कामासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली.यामध्ये सर्वात कमी दराने आलेल्या ८ कोटी ६० लाख ९८ हजार रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. स्मारकाचा आराखडा मंजूर झाला असून निविदाप्रक्रियाही पूर्ण झाली आहे. कार्यादेश व भूमिपूजन झाल्यानंतर बारा महिन्यांच्या कालावधीत स्मारकाची उभारणी पूर्ण होईल, असे भवनरचना विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.
असे असेल स्मारक
> तीन अधिक एक असे चार मजली स्मारक
> तळघरात दुचाकींसाठी वाहनतळ
> तळमजल्यावर फुले दांपत्याचे पुतळे
> पहिल्या मजल्यावर फुले दांपत्याच्या कार्याची माहिती देणारे कक्ष
> वरच्या मजल्यावर महिला सक्षमीकरण कक्ष
> संगणक केंद्र व कला विकास केंद्र
> तिसऱ्या मजल्यावर ग्रंथालय, शिक्षक खोली व मुख्याध्यापक कक्ष
या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली मुलींची शाळा सुरू केली होती. भारतात सर्वप्रथम स्थापन करण्यात आलेल्या मुलींच्या शाळांपैकी ही एक शाळा होती. या शाळेत सावित्रीबाई फुले शिक्षण देण्याचे काम करत.