छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स (सीएसएमटी) येथे आरडीएक्स ठेवण्याची धमकी देत पोलिस यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या सचिन शिंदे तरुणाला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी सांगली पोलिस ठाणे उडवून देण्याची कॉल त्याने केला होता. रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात मोबाइल चोरीचा गुन्हा त्याच्यावर दाखल असून तो सीएसएमटी परिसरात मोलमजूरीची कामे करत असल्याची माहिती समोर आली आहे.
सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्याच्या अंमलदार कक्षात शुक्रवारी संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पवन कुमार नावाने फोन आला. ‘मी पंधरा मिनिटात सीएसएमटीमध्ये आरडीएक्स ठेवणार आहे’, असे सांगून फोन कट करण्यात आला. रेल्वे स्थानकात साडे सहाची वेळ म्हणजे गर्दीची वेळ. यावेळी सीएसएमटीतील मुख्य, हार्बर, मेल-एक्स्प्रेस फलाट आणि स्थानक परिसरात हजारो सर्वसामान्यांची वर्दळ असते. यामुळे हा फोन गांभीर्याने घेत रेल्वे पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली.
एकीकडे शोध मोहीम सुरू असतानाच मोबाइल क्रमांकाचा माग घेत फोन करणाऱ्याचा ठाव-ठिकाणा शोधण्याचे काम ही सुरू झाले. सर्व फलाट, गर्दीची ठिकाणे, आरडीएक्स सदृश्य वस्तूची तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही. यामुळे हा फसवा फोन असल्याचे रेल्वे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्यांनी सुटकेचा श्वास टाकला. मात्र फोन करणाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
सीएसएमटी आरडीएक्सने उडवून देऊ म्हणून कॉल करणाऱ्याचे लोकेशन स्थानक परिसरात आढळल्याने पोलिसांनी अधिक सतर्कपणे त्याचा शोध सुरू केला. दरम्यान त्याच्या मोबाइलचे लोकेशन ही मिळेनासे झाले. यावेळी आपल्या ‘खास शैलीत’ पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि अवघ्या दीड तासात त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
यापूर्वीही केले कॉल
रेल्वे पोलिसांनी आज अटक केलेल्या सचिन शिंदे या तरुणाने याआधी देखील असे धमकीचे कॉल केले होते. त्याने सांगली पोलीस ठाणे उडवून देणारा धमकीचा कॉल केला होता.