शनिवारपासून उत्तर कोकणासह दक्षिण कोकणातही पावसाचा जोर फारसा नसेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. मंगळवारपर्यंतच्या पूर्वानुमानानुसार, कोकण विभागात सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. यासोबतच मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर मंगळवारपर्यंत फारसा नाही. मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मंगळवारपर्यंत मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र विदर्भामध्ये ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. या विभागात मेघगर्जनेसह, विजांचाही अनुभव येऊ शकेल. या काळात पाऊस पडेल, पण सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
१५ ऑगस्टनंतर २२ ऑगस्टपर्यंतच्या आठवड्यात मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र या काळात कोकणातील स्थिती फारशी दिलासादायक नाही. दक्षिण कोकणात २२ ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढू शकतो, तर उत्तर कोकणासाठी सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल, अशीही शक्यता आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी आत्तापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस नोंदला गेला आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार कोकण विभागाला दिलासा मिळालेला आहे.
कुलाब्यातही सरासरी ओलांडली
शुक्रवारी कुलाबा येथील पावसानेही सप्टेंबरपर्यंतची सरासरी ओलांडली. याच आठवड्यात सांताक्रूझ केंद्रानेही सप्टेंबरअखेरपर्यंतची पावसाची सरासरी गाठली होती. गुरुवारी सकाळी ८.३० ते शुक्रवारी सकाळी ८.३० या कालावधीत कुलाबा येथे ४.६ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. त्यामुळे कुलाबा येथे पावसाळ्यात एकूण २०२३.३ मिलीमीटर पाऊस झाला. कुलाबा येथे सप्टेंबर अखेरपर्यंत २०२१.४ मिलीमीटर पाऊस नोंदला जातो. यामुळे आता सप्टेंबरपर्यंतचा मुंबईचा पावसाचा कोटा पूर्ण झाला आहे. असे असले, तरी मोठा कालावधी पावसाशिवाय गेला, तर मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागेल, अशी शक्यता आहे.