मुंबई-नागपूर यांना जोडणारा समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किमी लांबीचा आहे. त्यापैकी ६२५ किमी लांबीचा मार्ग आतापर्यंत दोन टप्प्यात सुरू झाला आहे. यामुळे इगतपुरी-नागपूर-इगतपुरी हा भाग सहा ते सात तासांत जोडला गेला आहे. आता उर्वरित व अखेरचा टप्पा सुरू होण्याची प्रतीक्षा असतानाच तो पुढील दीड महिन्यात पूर्ण होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
‘समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमने या अखेरच्या ७६ किमीच्या टप्प्यात १६ दऱ्या असून, त्यावर १६ पूल उभारले आहेत. राज्यातील सर्वांत मोठ्या रस्ते बोगद्यासह एकूण पाच बोगदे आहेत. त्यातून हा भाग डोंगर, दऱ्या, जंगलाने व्यापलेला आहे. यामुळेच या टप्प्यातील उभारणी ही आव्हानात्मक होती. ही उभारणी एका पुलाच्या एका बाजूखेरीज पूर्ण झाली आहे. आता केवळ अखेरची कामे सुरू आहेत. या कामांसह सप्टेंबरअखेरीस महामार्गाचा हा टप्पा व पर्यायाने संपूर्ण महामार्गाची उभारणी पूर्ण होईल. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये उर्वरित टप्पा सुरू करायचा की नाही, हा सरकारचा निर्णय असेल,’ असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
समृद्धी महामार्गाचा हा अखेरचा टप्पा इगतपुरी आंतर-बदलाच्या पिंपरी सद्रोद्दीन ते भिवंडीजवळील आमनेपर्यंत आहे. तेथे येऊन हा महामार्ग संपणार आहे. यामध्ये बांधकामाच्या एकूण तीन पॅकेजचा समावेश आहे. त्यामध्ये दारणा नदीवरील पुलासह ७.७६ किमी लांबीचा देशातील सर्वाधिक रुंदीचा १८० अंशाच्या उतारावरील बोगदा आहे. त्याखेरीज समृद्धी महामार्गावरील ८४ मीटर उंचीचा पूल कसारा ते खर्डीदरम्यान आहे. या पुलाची एक बाजू अद्याप बाकी असली तरीही उर्वरित बाजूने दोन्हीकडील वाहतूक सुरू होणे शक्य आहे. कसाऱ्याजवळ बोगद्याला लागून ६० मीटर उंचीचा पूलदेखील आहे. अशा आव्हानात्मक बांधकामामुळेच हा टप्पा पूर्ण होण्यास काहीसा विलंब झाल्याचे गायकवाड यांनी या पुलाच्या प्रत्यक्ष पाहणीवेळी स्पष्ट केले.
अखेरचा टप्पा असा
लांबी : ७६ किमी
पॅकेज १४ : पिंपरी सद्रोद्दीन (इगतपुरी) ते वशाला बुद्रुक – १ बोगदा, २ पूल व १ आंतरबदल
पॅकेज १५ : वशाळा बुद्रुक ते बिरवाडी – २ बोगदे, १० पूल
पॅकेज १६ : बिरवाडी ते आमने (भिवंडी) – २ बोगदे – ५ पूल