महेश पाटील, नंदुरबार : शेतातून घरी आल्यानंतर घरातील पाण्याची मोटर सुरू करताना एका प्रगतशील शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. घरातील कर्ता मुलाचा मृत्यू डोळ्यादेखत वयस्क पित्याने पाहिला. या घटनेचा जबर हादरा बसल्याने मुलाच्या दशक्रियाविधी होण्यापूर्वीच वृद्ध वडिलांचेही निधन झाल्याची घटना शहादा तालुक्यातील कळंबू येथे घडली. आठवडाभरात पिता-पुत्राच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.शहादा तालुक्यातील कळंबू येथील प्रगतशील शेतकरी संजय आत्माराम बोरसे (वय ५८) ३१ जुलै रोजी दुपारी शेतातून घरी आल्यावर, घरातील पाण्याची मोटार चालू करताना विजेचा जबर शॉक लागून बाजूला फेकले जाऊन बेशुद्ध पडले. त्यांना कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने पुढील उपचारासाठी शहादा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. शहादा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. १ ऑगस्ट रोजी कळंबू गावात संजय बोरसे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.
आठ दिवसात वडिलांनी सोडला प्राण
संजय बोरसे यांचे निधन झाले. घरात वृध्द आई वडील असताना कर्ता पुरुष गेल्याने आई वडिलांना धक्का बसला. आई वडील हयात असताना मोठ्या मुलाचे निधन झाल्याने विरह सहन न झाल्याने वडील आत्माराम ओंकार बोरसे (वय ८५) यांनी अन्न, पानी सोडले मुलाच्या मृत्यूआधी त्यांची प्रकृती चांगली होती. अखेर त्यांनी ८ ऑगस्ट रोजी मुलाच्या वीरहाने त्यांनी प्राण सोडला. संजय बोरसे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम ९ ऑगस्ट रोजी होता. मात्र, दशक्रियाविधी आधीच वडिलांनी प्राण सोडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आठ दिवसातच बाप आणि मुलाचा मृत्यू झाला. मुलगा आणि वडील दोघांचे एकाच दिवशी विधी करण्यात आल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.