घालीन लोटांगण वंदिन चरण…; उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी ठाण्यात बॅनरवॉर

ठाणे : उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये जाहीर सभा होणार असून ठाकरेंच्या सभेपूर्वीच ठाकरे गट आणि मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेत बॅनर वॉर सुरु झाले आहे. दोन दिवसांपूर्वी उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी दुसऱ्याचा पक्ष चोरणे हे हिंदुत्व आहे का? या आशयाचे बॅनर लावून शिंदेच्या शिवसेनेला डिवचले होते. मात्र, आज शिंदेच्या शिवसेनेकडूनही बॅनरच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आले आहेत. यामुळे ठाण्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.उद्धव ठाकरे हे ठाण्यात आज संध्याकाळी जाहीर सभा घेत आहेत. ठाकरे यांच्या सभेसाठी माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र ही सभा होण्यापूर्वीच दोन्ही पक्षात बॅनरबाजीमुळे कमालीचा संघर्ष उफाळून आला आहे. ठाण्यातील तीन पेट्रोल पंप, हरिनिवास सर्कल आणि इतर ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे बॅनर्स शिंदेच्या शिवसेनेकडून लावण्यात आल्यानंतर या विरोधात ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना डिवचनारे बॅनर्स लावण्यात आले आहेत, त्या ठिकाणाहून ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून बॅनर्स काढण्यात येत आहेत.
घोटाळेबाज गुप्ता बंधूंशी ठाकरेंची भेट, दिल्लीत अर्धा तास चर्चा, शिंदेंच्या खासदाराचे गंभीर आरोप
उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठत असताना ठाण्यात बॅनर्सवर व्यंगचित्राच्या माध्यमातून सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्या समोर उद्धव ठाकरे गुडघे टेकलेले दाखवण्यात आले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या मागे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे देखील उभे असलेले दाखवण्यात आले आहेत. ठाण्यात एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले असताना उद्धव ठाकरे यांना अशाप्रकारे डिवचण्याचे बॅनर देखील लावण्यात आले असल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

शिंदेंच्या खासदाराचे ठाकरेंवर गंभीर आरोप

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा नुकताच दिल्ली दौरा झाला. ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. या दिल्ली दौऱ्यावर ठाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी बोचरी टीका केली आहे. त्यांनी काही गंभीर आरोपही केले आहेत. ”उद्धव ठाकरे यांचा हा सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला. मला मुख्यमंत्री करा, असा कटोरा घेऊन ते दिल्लीत आले होते. पण काँग्रेसने त्यांना अजिबात भाव दिला नाही. संजय राऊत यांनी स्वतःच राजकीय महत्व वाढवणं आणि उद्धव ठाकरे यांना मी कसं नाचवू शकतो हे दाखवणारा हा दौरा होता”, अशी टीका नरेश म्हस्के यांनी यावेळी केली.

Source link

Maharashtra Political Newsthane banner warthane marathi newsuddhav thackeray breaking newsउद्धव ठाकरे ब्रेकिंग बातम्याठाणे बॅनरवॉरठाणे मराठी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्या
Comments (0)
Add Comment