रेल्वेच्या मंजुरीनंतर काम सुरू होणार
आता एमएमआरडीएने वसई-विरार शहरात ट्रॅफिकच्या समस्येवर उपाय म्हणून ४ ब्रिजसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. आता रेल्वेची परवानगी मिळाल्यानंतर याचं काम सुरू केलं जाणार आहे. या फ्लायओव्हर ब्रिजमुळे वसई-विरारमधील पूर्व – पश्चिम एकमेकांना जोडणं अधिक सोपं होणार आहे. त्याशिवाय ट्रॅफिकपासूनही दिलासा मिळेल.
शहरात सर्वाधिक ट्रॅफिक शहरातील पूर्ण आणि पश्चिमेला जोडणाऱ्या ठिकाणी होते. विरार आणि नालासोपारा येथील फ्लायओव्हर हे अरुंद आहेत, त्यामुळे मोठी गर्दी इथे होते. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी मनपाने नायगाव ते विरारपर्यंत सहा फ्लायओव्हर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पण मनपाचं बजेट नसल्याने तत्कालीन आयुक्तांनी याचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे पाठवला. इथूनही कोणतंही उत्तर आलं नव्हतं.
एमएमआरडीएकडून कोणतंही उत्तर न आल्याने आमदार हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील आणि क्षितिज ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला यावर त्वरित काम करण्याचं सांगितलं आणि एमएमआरडीएने चार ब्रिज बनवण्यास मंजुरी दिली. आता केवळ रेल्वेची एनओसी मिळाल्यानंतर हे काम सुरू केलं जाईल.
वसई-विरारमध्ये चार फ्लायओव्हरमुळे येथील नागरिकांना ट्रॅफिकच्या समस्येपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. यामुळे ५० टक्के ट्रॅफिक कमी होऊ शकतं. रेल्वेच्या परवानगीनंतर आता या चार ब्रिजचं काम सुरू केलं जाणार आहे.
कसा असेल ओव्हरब्रिजचा मार्ग?
अलकापुरी – वसई आणि नालासोपारा रेल्वे स्टेशनदरम्यान
ओसवाल नगरी – विरार आणि नालासोपारा रेल्वे स्टेशन
विराट नगर – विरार आणि नालासोपारा रेल्वे स्टेशन
उमेलमान – वसई आणि नायगाव रेल्वे स्टेशन