लेझर दिव्यांमुळे होणाऱ्या प्रकाश प्रदूषणासंदर्भात अद्याप कोणत्याही सूचना जारी करण्यात आल्या नसल्याचे राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने स्पष्ट केले. गणेशोत्सव पर्यावरणस्नेही व्हावा यासाठी सूचना दिलेल्या असतात, तीच अपेक्षा या सणाकडून असल्याचे सांगण्यात आले. मात्र, गेल्या वर्षीच्या दुर्घटनेनंतरही यावर कायदेशीर तरतूद झालेली नाही. अशा प्रकारचे प्रकाश प्रदूषण रोखण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ विचार करत असल्याचे ‘एमपीसीबी’कडून सांगण्यात आले आहे. मात्र, याबद्दल निर्णय झालेला नाही. ‘ध्वनिप्रदूषणासंदर्भात पूर्वीप्रमाणेच देखरेख आणि नियंत्रण होणार आहे. यासंदर्भात कारवाईचे अधिकार पोलिसांना देण्यात आले असून, याबाबतचा अहवाल गृहविभागाला पाठवला जाईल,’ असे ‘एमपीसीबी’कडून सांगण्यात आले.
दरम्यान, ‘वाईट गोष्टींचा प्रतिबंध करणे आवश्यक आहे. ध्वनिप्रदूषणासंदर्भात केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून, मुंबईत गेल्या दोन वर्षांमध्ये डीजेचा वापर कमी झाला आहे. डीजेच्या पूर्वीच्या आवाजाच्या तुलनेत मुंबईत सध्या केवळ पाच ते सहा टक्केच ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण राहिले आहे,’ असे निरीक्षण बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी नोंदवले. तसेच प्रकाश प्रदूषणाच्या बाबतीतही अशीच पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ‘प्रकाश प्रदूषण हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी निगडित असल्याने याचा विचार समाजानेही करायला हवा. लेझर दिव्यांचा वापर, डीजे या गोष्टी चुकीच्या आहेत हे आपल्याला जाणवायला हवे. सरकारने याबाबत गांभीर्याने करायला विचार हवा, पण तो होताना दिसत नाही,’ असे मत गणेशोत्सवातील प्रदूषणविरोधी मोहिमेतील सक्रिय कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी नोंदवले. ‘कायदा निर्माण होऊनही ध्वनिप्रदूषण, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती यांचे अस्तित्व आपल्याला दिसते. कोणत्याही सरकारने लोकप्रिय गोष्टी सोडून समाजाच्या दीर्घकालीन हिताचा गांभीर्याने विचार करायला हवा,’ असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईमध्ये पुण्याप्रमाणे मिरवणुकीदरम्यान लेझर दिव्यांचा त्रास नाही. तरीही मागील काही काळात असा प्रकार कोणत्या विभागात होत असेल तर मंडळांशी चर्चा करण्यात येईल.- अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती
प्रकाश प्रदूषणाबाबत केवळ सरकार, पोलिसांवर अवलंबून राहता येणार नाही. उत्सवांमधील आनंद टिकवण्यासाठी व समाजाला घातक गोष्टी टाळण्यासाठी समाजानेच पुढाकार घ्यायला हवा. – डॉ. महेश बेडेकर, गणेशोत्सवातील प्रदूषणविरोधी मोहिमेतील सक्रिय कार्यकर्ते