राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मोदीबाग येथील निवासस्थानी या दोन्ही नेत्यांनी त्यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन चर्चा केली. महायुतीच्या सरकारमध्ये बच्चू कडू यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही. दुसरीकडे कडू यांची मागणी मान्य करीत दिव्यांग मंत्रालय सुरू करण्यात आले असले, तरी त्याला पुरेसा निधी मिळालेला नाही. याशिवाय सरकार असले, तरी कामे होत नाहीत, अशी तक्रार कडू यांनी नुकतीच केली होती. या पार्श्वभूमीवर कडू थेट पवारांच्या भेटीला आल्याने ते महाविकास आघाडीत येणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
‘झेंडा नव्हे अजेंडा महत्त्वाचा’
‘आमच्यासाठी झेंडा नव्हे, तर अजेंडा महत्त्वाचा आहे,’ असे सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना केले. आमची बैठक पूर्वनिश्चित होती. राजकीय चर्चा होते; पण जनतेचे मुद्दे मागे पडतात. प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, गड किल्ले, कामगार, शेतकरी, शेतमजूर आदी १७ मुद्द्यांबाबत शरद पवारांशी चर्चा झाली. या मुद्द्यांसाठी राजकीय दबाव निर्माण व्हावा, यासाठी माझे प्रयत्न आहेत, त्यासाठीच पवारांची भेट घेतल्याचे कडू म्हणाले.
दरम्यान, पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले आणि उमेदवारी नाकारल्याने नाराजी उघडपणे व्यक्त केलेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी भाजपचे माजी नगरसेवक शंकर पवारदेखील त्यांच्यासोबत होते.
‘वैयक्तिक कामासाठी भेट’
‘शरद पवार यांच्याशी माझे गेल्या ४० वर्षांपासून राजकारणापलीकडचे संबंध आहेत. माझे मित्र शंकर पवार यांच्या कामानिमित्त आम्ही पवार यांना भेटलो. ही भेट वैयक्तिक कामासाठी असल्याने या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. माझ्या या भेटीवर पक्षातील कोणी काही बोलले, तर उत्तर देण्यास सक्षम आहे; तसेच पक्षाने याबाबत विचारणा केल्यास स्पष्टीकरण देण्यास तयार आहे. माझ्या पक्षाचा माझ्यावर विश्वास नसेल, तर मला त्याचे काही देणेघेणे नाही,’ असे संजय काकडे यांनी स्पष्ट केले. ‘बच्चू कडू यांचा स्वतंत्र पक्ष असून, त्यांचे दोन आमदारही आहेत. त्यांना मी युती-आघाडीचा सल्ला देऊ शकत नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे ते कुठे जातील असे मला वाटत नाही,’ असेही काकडे म्हणाले.
‘बच्चू कडू महत्त्वाचे नेते’
पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे या भेटींवेळी मोदीबागेत उपस्थित होत्या. ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज्यातील सर्व चांगल्या लोकांनी एकत्र यावे, असा आमचा प्रयत्न आहे. बच्चू कडू हे राज्यातील महत्त्वाचे नेते आहेत,’ असे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.