उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न
सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. मात्र, हल्लेखोराकडे असलेली रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळीच उडाली नाही; त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ही संपूर्ण घटना हल्ल्याचा प्रयत्न झालेल्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. हल्लेखोर या प्रकारानंतर पसार झाला.
कवठेमहांकाळ येथे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील याच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबाराचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळी उडाली नाही. रात्री कवठेमहांकाळ शहरातील एका मोबाइल शॉपीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. घटनेची शनिवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
…अन् थोडक्यात अनर्थ टळला
शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचे बंधू युवराज पाटील यांचे अभिजित पाटील हे पुत्र आहेत. शनिवारी (१० ऑगस्ट) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते तहसील कार्यालयासमोरील एका मोबाइल दुकानात आले होते. ते दुकानात असताना यावेळी एका अज्ञात व्यक्तीने दुकानात प्रवेश केला. त्याने तोंडाला काळ्या कपड्याने लपवले होते. तसेच, त्याने ओळख कळू नये म्हणून डोक्यावर टोपी घातली होती. त्यानंतर त्याने दुकानात असलेल्या अभिजित पाटील यांच्यावर बंदुक ताणली. पण, सुदैवीने रिव्हॉल्व्हर लॉक झाली आणि गोळी उडाली नाही. आपल्यावर बंदूक ताणलेली पाहून अभिजित यांच्यासह दुकानातील इतर सारेच घाबरले. पण, रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने अभिजित थोडक्यात बचावले गेले. त्यानंतर या हल्लेखोराने तेथून पळ काढला.