नाना पुढे म्हणाले की, शक्तीपीठ महामार्गाला काँग्रेसचा विरोध आहे. समृद्धी महामार्गामुळे लोकांचे नुकसान झाले आहे. अनेक जणांच्या महामार्गालगत जमिनी घेतल्या आणि सरकारच्या पैशांची लूट केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. शेतकरी आत्महत्या वरून पटोले यांनी सरकारवर टिका केली. मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवारी जिंकून आणायचं आहे, तेव्हा कामाला लागण्याच्या सूचना नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना केल्या.
२४ फेब्रुवारीला नांदेडला स्वातंत्र्य मिळाले
काँग्रेसच्या विभागीय बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टिका केली. २४ फेब्रुवारीला अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपात गेले होते. देशाला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले आहे, पण नांदेडला विशेष करून मराठवाड्याला खरं स्वातंत्र्य २४ फेब्रुवारीला नांदेडला स्वातंत्र्य मिळाल्याचे नाना पटोले म्हणाले. मागच्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसची एकही जागा नव्हती पण, आता तीन ही जागा निवडून आल्या म्हणजे शंभर टक्के परफॉर्मन्स आहे असं देखील पटोले म्हणाले.
भाजपाला दुसऱ्यांची घर फोडण्याची मानसिकता आहे. उद्धव ठाकरे यांच घर फोडलं, शरद पवार यांचं देखील घर फोडलं आणि काँग्रेसचं देखील घर फोडण्याचं त्यांनी प्रयत्न केला, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढली आहे. भाजपचे अनेक नेते काँग्रेसमध्ये येणार आहे.
मराठा बांधव भेटण्यासाठी आले होते
काँग्रेसच्या विभागीय बैठकीत मराठा बांधवानी गोंधळ घातला. बैठक सुरू असताना मराठा बांधव स्टेजवर पोहचले, त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. पण मराठा बांधवानी गोंधळ घातला नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. आरक्षणासंदर्भात मराठा बांधव हे मला भेटण्यासाठी आले होते, त्यांनी मला आरक्षणाबाबत निवेदन देखील दिल्याचं पटोले यावेळी म्हणाले.