त्यांची जागा दाखवून द्यायची आता वेळ आली आहे…
अमोल कोल्हे शिवस्वराज्य यात्रेतील सभेत ते पुढे म्हणाले, बारामतीकरांनी लोकसभेला दाखवून दिले आहे. आता वेळ आली आहे, त्यांची जागा दाखवून द्यायची. साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य नव्हे देशातील सरकार बदलणार आहोत, त्यामुळे लोकसभेसारखे काम आपल्याला करायचे असल्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सध्या सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, काही योजनांचा पोहा पोहा…सुरू आहे. या योजनांची ‘फोड’ बारामतीकरांसारखी कोणीही करू शकत नाही. नऊ वर्ष भाऊ रोज दारावरून जातो कधीच वळत नाही आणि अचानक भाऊ दारात आला आणि म्हणाला रक्षाबंधन करतो ओवाळणी घाल. भावाने सांगावं बहिणीने काय करावे. इतके वर्ष आठवण झाली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहीण लाडकी नव्हती. निवडणुकीनंतर ही जर परिस्थिती येत असेल तर काय डोळ्यासमोर ठेवून कोण निर्णय घेते हे पाहिलं पाहिजे, असंही कोल्हे यावेळी म्हणाले.
वाघाच्या आवाजाचं म्याव म्याव झालं की काय…कळेना झालंय…
काहीजण म्हणतात की, विकासासाठी लोक जातात. हे आपण अनेकदा ऐकतो. आम्हाला एक कायम दरारातील आवाज ऐकायची सवय होती. वाघाच्या आवाजाचं म्याव म्याव झालं की काय…कळेना झालेय, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली.
दरम्यान, नांदेडमध्ये सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अजित पवारांवर, लोकसभेत बहिणीच्या विरोधात बायकोला उभे केले असल्याचे पाहिले आहे, असं म्हणत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. लाडकी बहीण ही योजना कशासाठी आहे हे अजित पवार यांच्या भाषणातून समोर आले असल्याचंही ते म्हणाले.