‘ही योजना कशासाठी हे अजित पवार यांच्या भाषणातून समोर’
काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवारी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्याआधी नाना पटोले यांची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, खासदार वसंतराव चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे, राजेश पावडे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, ‘एकीकडे लाडकी बहिण करायचे आणि दुसरीकडे बहिणीच्या विरोधात बायकोला उभे करायचे हे लोकसभेत पाहिले आहे. ही योजना कशासाठी आहे हे अजित पवार यांच्या कालच्या भाषणातून समोर आले आहे.’
महिला, तरुणी बेपत्ता याची माहिती सरकारकडे नाही
मताच्या बोटापुरती ही योजना असून महाराष्ट्रातील पाच लाख महिला, तरुणी बेपत्ता आहेत. याची ना चिंता आणि माहितीही या सरकारकडे नाही. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. शंकरराव, विलासराव असे नेतृत्व राज्याला लाभले आहे. येथील सांस्कृतिक, सामाजिक व्यवस्थेला केंद्र आणि राज्य सरकार डॅमेज करत आहे. विकासाच्या नावाने खड्डे, शेतकरी, बेरोजगारांची थट्टा केली जात आहे. जनतेमधून सरकारवर रोष दिसून येत आहे. सध्या भाजप खोक्यांच्या गर्तेत सापडला आहे, अशी टिका पटोले यांनी केली.
जागा वाटपबाबत १६ ऑगस्टला महाविकास आघाडीची बैठक
आगामी विधानसभा महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. जागा वाटपासंबंधी आमची पहिली एक बैठक झाली आहे. आता १६ ऑगस्टला मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उध्दव ठाकरे गट) या तिन्ही पक्षांची सभा होणार आहे. त्यावेळी जागा वाटप होईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.
क्रॉसवोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई होणार
विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदारांवर करावाई करण्याचे संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. कारवाईबाबत निर्णय ठरलेले आहेत. ज्यांनी ज्यांनी क्रॉस वोटिंग केली, त्यांची नावे आपल्याला तिकीट वाटपात दरम्यान कळणार आहे अशी प्रतिक्रिया नाना पटेल यांनी दिली. देगलूरचे काँग्रेस आमदार जितेश अंतापुरकर सध्या भाजप नेत्यांसोबत संपर्कात आहेत, याबाबत विचारलं असता कोणालाही जबरदस्ती नाही, काँग्रेसमुळे ते आमदार झालेत, काँग्रेस विरोधात जायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, देगलूर मधील जनता हे काँग्रेसचा विचारायचे असल्याचे ते म्हणाले.