बारामतीत अजित पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे लोकसभेला सुनेत्रा पवार यांना मतांचा फटका बसल्याचे दिसून आले. शिवाय ‘मलिदा गॅंग’, कॉन्ट्रॅक्टर तसेच स्वतः शिवाय जनाधार नसलेले पदाधिकारी अजित पवारांसमवेत तसेच व्यासपीठावर पुढे पुढे करत असल्याने सामान्य कार्यकर्त्यांसह मतदार नाराज असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. लोकसभेत झालेल्या या बाबी दुरुस्त करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक नेमण्यात आला आहे.
५० वर्षात पहिल्यांदाच बारामतीत निरीक्षकाची नेमणूक..!
बारामती लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो बारामतीकरांनी मागील ५० वर्षांपासून पवारांची साथ सोडली नाही. या प्रत्येक निवडणुकांमध्ये पवार कुटुंबियांच्या पाठीशी नेहमीच बारामतीकर ठामपणे उभे ठाकले. मात्र दरम्यानच्या काळात पक्षात पडलेल्या फुटीमुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह मतदारही अद्याप द्वीधा मनस्थितीत असल्याचे दिसते. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लोकसभेची लढत मोठी चुरशीची पाहिला मिळाली. विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार सक्रिय असून त्यांना बारामती विधानसभेची उमेदवारी मिळेल असे बोलले जात आहे. त्यामुळे बारामती मतदार संघातून उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिल्यांदाच बारामतीत बारामती विधानसभेसाठी पवार विरुद्ध पवार असा सामना होणार असल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून निरीक्षक नेमण्यात आला आहे.