माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या रिंगणात, मतदारसंघ ठरला, पक्षाबाबत म्हणतात…

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरत आहेत. निवडणुकांच्या घोषणेआधीच पांडेंनी आपला इरादा जाहीर केला आहे. फेसबुकवर फोटो पोस्ट करत पांडेंनी शड्डू ठोकला आहे. विशेष म्हणजे त्यांनी मतदारसंघ जाहीर केला असला, तरी पक्षाबद्दल त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं आहे. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या संजय पांडेंच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केली आहे. त्यांनी स्वतःच आपली उमेदवारी जाहीर केली आहे. कोणताही पक्ष सोबत नाही, असं संजय पांडेंनी स्पष्ट केलं आहे. रविवारी वर्सोवा भागातील झुलेलाल मंदिरात निवडणुकीचा ‘नारळ’ वाढवत, प्रचारात आघाडी घेतली आहे.

फेसबुकवर घोषणा

“आज वर्सोवा येथे झुळेलाल मंदिरापासून वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून मी प्रचाराला सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करु” असं संजय पांडे यांनी लिहिलं आहे.

फोन टॅपिंग प्रकरणी अटक

संजय पांडे हे अनेक वेळा वादात सापडले आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज कर्मचार्‍यांशी संबंधित फोन टॅपिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दिल्ली उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. ते १९८६ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्तपद भूषवलं आहे.

संजय पांडे पोलीस महासंचालकपदी असताना त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोप मागे घेण्यासाठी दबाव निर्माण केला असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.

वर्सोवा विधानसभा मतदारसंघ

वर्सोवा हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात येतो. वर्सोव्यात सध्या भारतीय जनता पक्षाकडून भारती लव्हेकर आमदार आहेत. २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन वेळा त्यांनी आमदारकी मिळवली आहे. आता संजय पांडे कोणत्या पक्षाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरतात, की अपक्ष लढतात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Source link

maharashtra assembly election 2024Sanjay Pandey IPSVidhan Sabha Nivadnukभारती लव्हेकरमुंबई पोलीस आयुक्तवर्सोवा विधानसभाविधानसभा निवडणूक २०२४संजय पांडे
Comments (0)
Add Comment