रविंद्र हाके मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. ते मूळचे पुण्याच्या इंदापूरातील मदनवाडीचे रहिवासी होते. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. चारच दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीनं बाळाला जन्म दिला. बाबा म्हणून ‘प्रमोशन’ मिळालेले हाके खूप आनंदात होते. पत्नी आणि बाळासोबत अधिकाधिक वेळ घालवता यावा यासाठी त्यांनी कामापासून जवळच भाड्यानं राहण्यासाठी घराचा शोध सुरु केला.
कांजूर म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या मित्राला रविंद्र हाकेंनी रविवारी कॉल केला. आपण घर पाहायला येणार असल्याचं हाकेंनी कळवलं. रात्रपाळीचं काम संपवून हाके रविवारी सकाळी कांजूर स्थानकात उतरले. मेगाब्लॉक असल्यानं प्रवाशांची गर्दी होती. लोकल उशिरानं धावत असल्यानं गर्दी वाढत चालली होती.
लोकल उशिरानं येणार असल्यानं हाकेंनी फलाट बदलण्यासाठी पुलाचा वापर न करता शॉर्टकट घेतला. ते रेल्वे रुळ ओलांडू लागले. कानाता हेडफोन घालून हाके रुळ ओलांडत होते. तितक्यात त्या रुळांवर रेल्वेची टॉवर वॅगन आली. चालकानं अनेकदा हॉर्न वाजवला. पण हेडफोनमुळे हाकेंना काहीच ऐकू आलं नाही. टॉवर वॅगननं त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी धावले. हाके यांना तातडीनं राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झालेला होता. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हाके यांच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनाबद्दल कळताच त्यांना जबर धक्का बसला. हाके यांच्या कुटुंबावर आणि मित्र परिवारामुळे शोकाकळा पसरली.