लोकसभेला झालेला तोटा भरून काढण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा सुरू आहे. अजित पवार यांच्याह पक्षातील सर्वच प्रमुख नेते यात्रेबरोबर अमळनेरमध्ये पोहोचले. यंदा शरद पवार यांच्या पक्षाकडून विधानसभा लढण्याचे पक्के केलेल्या साहेबराव पाटील यांचे मन वळविण्याचे नियोजन केलेल्या अजितदादांनी त्यांना भेटण्याचा प्लॅन केला. परंतु साहेबराव पाटील यांनी अजितदादांना जोरदार चकवा दिला.
अजितदादा संतापले, काही मिनिटांत घरातून बाहेर पडले!
त्याचे झाले असे, अजित पवार हे प्रमुख नेत्यांसह साहेबराव पाटील यांना भेटण्यासाठी त्यांच्या राजभवन या निवासस्थानी गेले. मात्र अजित पवार घरी येण्याआधीच साहेबराव पाटील घरातून बाहेर निघून गेले होते. त्यामुळे अजित पवार यांचे साहेबरावांच्या नातवाने केले. लागलीच अजित पवार यांच्या सहकाऱ्यांनी साहेबराव पाटील यांना फोन केले. परंतु त्यांनी कुणाच्याही फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काही मिनिटांतच अजित पवार संतापून घराबाहेर पडले.
अमळनेरचे सध्याचे राजकारण काय सांगते?
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील करतात. इकडे शिरीष चौधरी यांनी वेगळी चूल मांडून विधानसभेला अपक्ष लढणार असल्याचे घोषित केले आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून विधानसभा लढण्याची रणनीती साहेबराव पाटील यांनी आखलेली आहे. त्यांनी शरद पवार गटात जाऊन विधानसभा लढवू नये, अशी विनंती अनिल पाटील साहेबरावांना करत आहे. अगदी समझोता होऊन नगरपालिकेचा कारभार बघावा, अशा वावड्याही मध्यंतरी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उठल्या.
म्हणूनच साहेबरावांनी अजितदादांना भेटण्याचे टाळले!
परंतु गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साहेबराव पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे साहेबराव पाटील यांना विधानसभेला तयारीला लागण्याचे अप्रत्यक्ष संकेतच पवार यांनी दिल्याचे बोलले जाते. त्याचमुळे सोमवारी साहेबराव पाटील यांनी अजितदादांना भेटण्याचे टाळले असावे, असे बोलले जाते.