अपघातानंतर कंटेनरला आग, एकाचा होरपळून मृत्यू
यावेळी अपघातानंतर कंटेनरला आग लागली. या आगीत होरपळून एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इतर दोन जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी (१२ ऑगस्ट) पहाटे चारच्या सुमारास घडला. अपघातानंतर या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली होती. क्रेन आणि जेसीबीच्या साहाय्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, की कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली या राज्यमार्गावर पहाटे चारच्या सुमारास आयशर टेम्पो आणि कंटेनर यांच्यात भीषण धडक झाली. या भीषण अपघातात कंटेनरने पेट घेतला, तर आयशर टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातात एकाचा कंटेनरला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने अपघातातील जखमींना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना आणखी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर दोघांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या अपघातात कंटेनर संपूर्ण जळून खाक झाला आहे. तर, आयशर टेम्पोचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी सुमारे दोन तासानंतर अग्निशमन बंब दाखल झाला होता. मात्र, तोपर्यंत कंटेनर जळून खाक झाला होता. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची आणि जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीत. अपघात डुलकी लागल्याने झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी परिसरातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रेन व जेसीबीच्या साहाय्याने वाहने रस्त्याच्या बाजूला काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यांनी पोलिसांना सहकार्य केले. वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.