कारण, लोकसभेत ज्या मतदारसंघात ठाकरेंचा उमेदवार पडला तिथे विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आणि उमेदवार निवडताना आता दमछाक होणार हे दिसू लागलं आहे. कारण, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात जिथे ठाकरे गटासाठी जागा सुटू शकते, तिथे इच्छुकांनी गर्दी केली. लोकसभेचा उमेदवार पडलेला असतानाही ठाकरेंकडे एवढी गर्दी नेमकी का झालीय आणि ठाकरे फॅक्टर संभाजीनगरात पुन्हा का प्रभावी ठरतोय? जाणून घ्या…
मतदारसंघनिहाय संभाजीनगरमध्ये इच्छुकांनी भाऊगर्दी
शहर मध्य – किशनचंद तनवणी, नंदकुमार घोडेले, बाळासाहेब थोरात, बंडू ओक
शहर पश्चिम – राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, मनोज गांगवे, विजयराव साळवे
शहर पूर्व – राजू वैद्य आणि विश्वनाथ स्वामी
वैजापूर – भाऊसाहेब चिकटगावकर, अविनाश गलांडे, सचिन वाणी, संजय निकम, सुभाष कानडे, आनंदीताई अन्नदाते, प्रकाश चव्हाण, वर्षा जाधव, नंदू जाधव
गंगापूर – देवयानी डोणगावकर, कृष्णा डोणगावकर, लक्ष्मण सांगळे, दिनेश मुथा
कन्नड – आमदार उदयसिंग राजपूत, डॉ. अण्णासाहेब शिंदे
पैठण – दत्ता गोर्डे, मनोज पेरे, शुभम पिवळ, बद्रीनारायण भूमरे, विकास गोर्डे, अनिस पटेल
फुलंब्री – अक्षय खेडकर, नानासाहेब पळसकर, बाबासाहेब डांगे, अशोक शिंदे, जगन्नाथ पवार, शंकर ठोंबरे, सोमनाथ करपे
सिल्लोड – विठ्ठल बदर आणि रघुनाथ घारमोडे
संभाजीनगरातल्या मतदारसंघांमध्ये सध्या अतुल सावे, संजय शिरसाठ, संदिपान भुमरे यांसारखे एकसे बढकर एक ताकदीचे नेते आहेत. पण शहरात नगरसेवक राहिलेले नेतेही या ताकदवान नेत्यांच्या विरोधात उतरायला तयार आहेत आणि याला कारणीभूत आहे तो म्हणजे लोकसभेचा निकाल.
छ. संभाजीनगरात ठाकरे फॅक्टरवर जोर का?
लोकसभेत मराठा मतं भुमरेंकडे वळल्यामुळे खैरेंचा पराभव झाला. ठाकरेंचा उमेदवार पडला तरी सध्या इच्छुकांच्या गर्दीवर परिणाम झालेला नाही. मुस्लीम मतं सोबत घेण्यास यशस्वी ठरल्यामुळे ठाकरेंचा भाव वधारला आणि ठाकरे गटाचं तिकीट मिळाल्यास मुस्लीम मतं घेणं सोपं असा समज आहे. याशिवाय महाविकास आघाडीकडून लढताना इतर अल्पसंख्यांक मतंही मिळतील. मराठा आंदोलनाची झळ महाविकास आघाडीला फारशी न बसण्याचा इच्छुकांचा अंदाज आहे.
लोकसभेत मराठा मतं महाविकास आघाडीकडे वळल्याने इच्छुकांना विश्वास असून एमआयएमची मुस्लीम मतंही महाविकास आघाडीकडे वळतील अशी इच्छुकांना अपेक्षा आहे. वंचित फॅक्टर लोकसभेला फेल झाला, विधानसभेलाही तेच चित्र राहिल्यास मविआला फायदा होईल.
मराठवाड्यातल्या निवडणुकीचं समीकरण हे उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळं आहे. कारण, ओबीसी आणि मराठा आंदोलनाची केंद्र ही मराठवाड्यातच होती आणि त्याची सर्वात जास्त धग आजही याच भागात पाहायला मिळते. परिणामी निवडणुकीत उतरायचं तर उमेदवार चारही बाजूंचा विचार करतोय आणि त्यामुळेच ठाकरेंकडे गर्दी झालीय असं म्हणता येईल.. संभाजीनगरमधल्या इच्छुकांच्या गर्दीबाबत तुमचं काय मत आहे तेही कमेंटमध्ये जरुर कळवा..