विक्रोळी पूर्व भागातील कन्नमवार नगर येथे मधुकुंज ही २० मजल्यांची एक इमारत आहे. इमारतीत सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. तरीही त्यांची नजर चुकवून रविवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास अक्षय या इमारतीत शिरला.
चेहरा लपवत वर पोहोचला
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपला चेहरा येऊ नये यासाठी, त्याने चेहरा रुमालाने झाकला होता. काही मजले वर गेल्यानंतर इमारतीबाहेरूनच त्याने निश्चित केलेल्या घरामध्ये चोरी करण्यासाठी आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला आणि तो उंचावरून खाली कोसळला.
अक्षय खाली पडल्याने जोरदार आवाज झाला, हे ऐकून सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी पोहोचला. तिथे अनोळखी तरूण दिसत असल्याने सुरक्षा रक्षकाने विक्रोळी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. काहीच वेळातच विक्रोळी पोलीस घटनास्थळी आले.
१४ व्या मजल्यावरुन पडल्याचा अंदाज
पोलिसांनी अक्षयला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अक्षय हा नेमका कितव्या मजल्यावरून पडला हे स्पष्ट झालेले नाही, मात्र तो १४ व्या मजल्यावरुन खाली पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे. अर्जुनच्या कुटुंबीयांना या विषयी माहिती देण्यात आली आहे.
हत्या प्रकरणात आरोपी
२२ वर्षांचा अक्षय हा चोरी, हत्या आणि हत्येचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याची माहिती आहे. नुकत्याच कसारा भागात झालेल्या एका हत्या प्रकरणातही तो आरोपी होता. तो विक्रोळीतील पार्क साईट भागात कुटुंबासह राहत असल्याची माहिती समोर आली आहे.