अपघातांमुळे रेल्वे फाटक बंद, पण विक्रोळी उड्डाणपूल पाच वर्ष रखडलेला, अखेर मुहूर्त लागला

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी सुमारे पाच वर्षांपूर्वी मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वेने फाटक बंद करून विक्रोळी रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी सुरू केली. मात्र, उड्डाणपुलाची रखडपट्टी सुरूच आहे. मे २०२४ पर्यंत उड्डाणपूल पूर्णत्वाचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले होते. आता या उड्डाणपुलासाठी मार्च २०२५ हा नवा मुहूर्त जाहीर करण्यात आला आहे.

विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ फाटक असल्याने ते ओलांडून अनेक जण पूर्व-पश्चिम असा प्रवास करत होते. वाहनचालकही याच मार्गाला पसंती देत होते. फाटक ओलांडताना पादचारी, वाहनचालकांचे अनेक अपघात झाल्याने उड्डाणपूल उभारण्याची मागणी स्थानिकांमधून होऊ लागली. त्यानुसार एप्रिल २०१८ मध्ये मुंबई महापालिकेने या कामाचे कार्यादेश काढले आणि एका कंपनीला कामही दिले.

मे २०१८ मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, जलद बांधकामासाठी पुलाच्या आराखड्यात अनेक बदल करण्यात आले. आयएस मानांकनाच्या नवीन प्रणालीमुळे आराखड्यात बदल करतानाच त्याच्या मंजुरी प्रक्रियेसही विलंब झाला आणि पुलाची रखडपट्टी सुरू झाली. साधारण २०२० च्या सुरुवातीला पुन्हा महत्त्वाच्या कामांना सुरुवात झाली. करोना काळात कामाची गती मंदावली आणि ही रखडपट्टी अद्यापही सुरूच आहे.

रेल्वे रूळांवरील पुलाचे काम हे मध्य रेल्वेकडून आणि रेल्वे हद्दीबाहेरील पूर्व-पश्चिमेकडील पोहोच रस्त्यांच्या कामाची जबाबदारी मुंबई महापालिकेच्या पूल विभागावर आहे. ही कामे सुरूच आहेत. रेल्वे हद्दीतील काम ९० टक्के पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. महापालिकेकडून पोहोच रस्त्याची कामे ७५ टक्के पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत १९ गर्डरपैकी १३ गर्डरची कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. पूर्वेकडील गर्डरचे बहुतांश काम झाले आहे. पश्चिमेकडील गर्डर कामे बाकी असून, ती प्रगतीपथावर आहेत. ही सर्व कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विक्रोळी पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल अद्यापही पूर्ण न झाल्याने स्थानिकांना मोठा फटका बसतो. पूल पूर्ण झाल्यास पश्चिमेकडून पूर्वेला टागोरनगर, कन्नमवार नगरला जाण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. पूल पूर्ण न झाल्याने विक्रोळी पश्चिमेकडून कांजुरमार्गला जावे लागते. तेथून गांधीनगर पूर्व द्रुतगती मार्गावर येऊन कन्नमवार नगरला जावे लागते. त्यासाठी अधिकचा पाच किलोमीटरचा प्रवास घडतो.

विलंब का?

-पुलासाठी लागणारी जागा गोदरेज कंपनी, गमाडिया ट्रस्ट आणि बेस्ट उपक्रमाकडून घेण्यात आली. त्यासाठीच्या प्रक्रियेला विलंब
-पुलाच्या मार्गात काही बांधकाम आणि झाडांचा, विविध सेवा मार्गांचा अडथळा
-पुलाचे काम सुरू झाल्यानंतर बदलण्यात आलेला आराखडा
-करोना काळातील कामाची संथगती
Mihir Shah Blood Report : ५८ तासांनी गेम फिरवला, वरळी हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट, मिहीर शाहचा युरिन रिपोर्ट सांगतो…

खर्चातही वाढ

मार्च २०१८ मध्ये कामाचे कार्यादेश काढून कंपनीला काम देण्यात आले. त्यावेळी प्रकल्पाची मूळ किंमत ३७ कोटी ०६ लाख २४ हजार रुपये होती. पावसाळा सोडून अठरा महिन्यांत पुलाचे काम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली होती. काम वेळेत पूर्ण झालेच नाही. शिवाय पुलाचा खर्च ७९ कोटी २० लाख ३९ हजार ७५८ रुपयांपर्यंत पोहोचला.

Source link

Bridges in MumbaiKannamwar Nagarmumbai newsVikhroli flyoverमध्य रेल्वेमुंबई फ्लायओव्हरमुंबई महापालिकाविक्रोळी उड्डाणपूल तारीख
Comments (0)
Add Comment