मुनव्वर फारुकीचा माफीनामा
नमस्कार मित्रांनो, मी काही गोष्टी स्पष्ट करत आहे, काही दिवसांपूर्वी एक शो झाला, त्यात प्रेक्षकांशी संवाद साधताना कोकणाचा विषय निघाला. तळोज्यात खूप कोकणी लोक राहतात मला माहिती होतं, कारण माझे बरेच मित्र आहेत. त्यावेळी काही गोष्टी आऊट ऑफ कन्टेक्स्ट गेल्या, बऱ्याच लोकांना वाटलं की मी कोकणाबद्दल वाईट बोलतोय, कोकणाची खिल्ली उडवली. पण माझा हेतू तो नव्हता, माझ्या तोंडून त्या गोष्टी निघाल्या. काही जणांच्या भावना दुखावल्या आहेत. एक स्टँडअप कॉमेडियन या नात्याने माझं काम लोकांना हसवणं आहे, कोणाला दुखावणं नाही. मी मनापासून माफी मागतो. मी जोक केला त्यांनी खूप एन्जॉय केलं, तिथे मराठी होते, मुस्लीम होते, हिंदू होते. मी पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो, अशा शब्दात मुनव्वर फारुकीने क्षमायाचना केली आहे.
नितेश राणेंची प्रतिक्रिया
फटके खाण्य अगोदर सरळ झाला.. परत कोकण आणि हिंदूंबद्दल बोललास तर.. direct action होईल ! जय कोकण, जय श्री राम, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी मुनव्वर फारुकीचा व्हिडिओ शेअर करत दिली आहे. माफीनाम्याआधी नितेश राणेंनी व्हिडिओ शेअर करत मुनव्वरला वळवळणारा हिरवा साप असं संबोधलं होतं.
मुनव्वर फारुकी नेमकं काय म्हणाला होता?
स्टँडअप कॉमेडी करताना मुनव्वरने प्रेक्षकांना विचारलं की “सगळे मुंबईतून आले आहेत ना? कुणी लांबचा प्रवास करुन आलंय का?” यावेळी प्रेक्षकांमधील एकाने आपण तळोजाहून आल्याचं सांगतो. त्यावर मुन्नवर म्हणाला की “तळोजा? अच्छा.. आज विचारलं की प्रवास करुन आलात का? तर तळोजा वेगळा झाला. पण यांचे गाववाले जेव्हा विचारतात की, कुठे राहतोस? तर मुंबईत असं सांगतात. हे कोकणी लोक सगळ्यांना चु** बनवतात. कोकणी आहात का तुम्ही?” असं मुनव्वर विचारताना व्हिडिओत दिसला होता.
मनसेचा संताप
या मुनव्वर फारुकीने पुन्हा गरळ ओकली. आता आपल्या कोकणी लोकांना म्हणतो की कोकणी लोक चु** बनवतात आणि वरून हसतोय. याला धडा मिळालाच पाहिजे, हा व्हिडिओ कोकण सुपुत्र अविनाश जाधव साहेब यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तेच याला चांगली अद्दल घडवतील, असं एका युजरने ट्विटरवर लिहिलं आहे.