‘फिनकर्व्ह फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड’ (एफएफएसएल) या बिगरबँकिंग वित्तीय कंपनीने ‘पॉकेटली इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड’ (पीआयपीएल) आणि त्या कंपनीचे संस्थापक आरवसिंग हरजीतसिंग भाटिया व नवदीश अहुजा यांच्याविरोधात केलेल्या वाणिज्यिक दाव्याच्या निमित्ताने हा विषय न्यायालयासमोर आला आहे. डिजिटल माध्यमातून कर्जपुरवठा करणाऱ्या या दोन्ही कंपन्यांमधील वादाबाबत लवकरच न्या. भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. ‘फिनकर्व्ह’तर्फे ज्येष्ठ वकील मुस्तफा डॉक्टर व त्यांची चमू आणि ‘पॉकेटली’तर्फे अॅड. कुणाल द्वारकादास व त्यांची चमू कायदेशीर बाजू मांडणार आहे.
‘पॉकेटलीने आपली फिनटेक कंपनी विकण्याचे ठरवून फिनकर्व्हसोबत बोलणी सुरू केली होती. फिनकर्व्हचे केतन कोठारी, प्रियांक कोठारी, सागर निशार व अमित श्रॉफ यांच्यासोबत भाटिया व अहुजा यांनी अनेकदा चर्चा केली आणि बैठका घेतल्या. १९ मार्चच्या बैठकीत ५१ कोटी रुपयांमध्ये व्यवहार ठरला आणि त्याप्रमाणे ५ एप्रिल रोजी करारनामा करण्याचे ठरले. १९ मार्च रोजीच अहुजा यांनी आर्वोग ऑगमाँट पॉकेटली नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यात दोन्ही बाजूच्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश केला. त्याच दिवशी त्यांनी करारासाठी दोन्ही बाजूंच्या सहमतीने ठरलेल्या मुख्य अटी ग्रुपवर टाकल्या. त्याला कोठारी यांनी हँडशेकची इमोजी टाकून सहमती दर्शवली. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींमध्ये बैठका झाल्या. बैठकीत अहुजा यांनीच अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. कर्जांचे वितरण, वसुली इत्यादीचा तपशील जमवणाऱ्या गरुड दृष्टी नावाच्या महत्त्वाच्या दस्तावेजाची माहितीही पॉकेटलीने दिली. त्यानंतर फिनकर्व्हने दोन एप्रिलला मुख्य अटी या शीर्षकाखाली करारनाम्याचा मसुदा पॉकेटलीला पाठवला. मात्र, पॉकेटलीने अचानक आपला इरादा बदलला आणि आम्हाला दुसऱ्या कंपनीकडून ऑफर आली असल्याचे ४ एप्रिल रोजी अहुजा यांना सांगितले. करार ठरला असताना पॉकेटलीने घूमजाव करत आमची मेहनत व्यर्थ ठरवली. त्यामुळे कराराचे पालन करण्याचा आदेश त्या कंपनीला द्यावा,’ असे फिनकर्व्हने आपल्या दाव्यात म्हटले आहे.
नेमके काय घडले?
‘फिनकर्व्ह’च्या नवदीश अहुजा यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून करारासाठी दोन्ही बाजूंच्या सहमतीने ठरलेल्या मुख्य अटी त्यावर टाकल्या. त्याला ‘पॉकेटली’च्या कोठारी यांनी हँडशेकची इमोजी टाकून सहमती दर्शवली. तर, ‘व्हॉट्सअॅपवरील हँडशेकने कराराला अंतिम रूप आल्याचा फिनकर्व्हचा दावा पूर्णपणे खोटा आहे, असा दावा ‘पॉकेटली’ने केला आहे.