काल नांदेड येथील बैठकीत नांदेड परभणी हिंगोली या तीन जिल्ह्यांचा आढावा काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी घेतला. या बैठकीमध्ये परभणीच्या चारही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे राहणार असून, तेथून सुरेश वरपूडकर हेच काँग्रेस पक्ष अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली आहे. अन्य तीन विधानसभा मतदारसंघांविषयी महाविकास आघाडीतील अन्य पक्षांशी चर्चा करून जो मतदारसंघ काँग्रेससाठी अनुकूल असेल, तो सोडून घेतला जाईल असेही नाना पटोले म्हणाले.
पाथरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटेल आणि तेथून एखाद्या मुस्लिम चेहऱ्याला तिकीट दिले जाईल या आशेने माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता. काही दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणी येथे चारही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, त्यावेळेस आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या कार्यकर्त्यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाला सोडून घ्यावा आणि तेथून आमदार बाबाजानी दुर्रानी यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीत चर्चा करू आणि त्यावर सकारात्मक तोडगा काढू असे सांगितले होते. त्यामुळे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी अजित पवार गटाला रामराम ठोकून शरद पवारांसोबत जाणे पसंत केले.
नाना पटोले यांनी काल पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने मात्र महाविकास आघाडीत चांगलाच पेच निर्माण झाला आहे. उमेदवारीच्या आशेने बाबाजानी दुर्रानी यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड होऊ शकतो. दुर्रानींनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून २०२४ ची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली नाही, तर ते अपक्ष म्हणून देखील निवडणूक लढू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये गटबाजी होऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना याचा चांगलाच फटका बसू शकतो.
पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे प्राबल्य आहे. काँग्रेस आमदार सुरेश वरपूडकर यांच्याबरोबरच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांचीही ताकद आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम चेहऱ्यांना संधी न दिल्याने महाविकास आघाडीवर मुस्लिम मतदार चांगलाच नाराज आहे. विधानसभा निवडणुकीत मुस्लिम चेहऱ्यांना उमेदवारी मिळण्याची आशा मुस्लिम मतदारांना आहे. मुस्लिम उमेदवारांना जास्तीत जास्त उमेदवारी देण्यासंदर्भात मुस्लिम मतदारांचा महाविकास आघाडीवर दबाव आहे. अशा परिस्थितीत पाथरी विधानसभा मतदारसंघातून आमदार बाबाजानी दुर्रानी यांची उमेदवारी कापण्यात आली तर मुस्लिम समाजामध्ये वेगळा संदेश जाण्याची भीती महाविकास आघाडीला आहे.