पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भांडणातून कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाची त्याच्याच सहकाऱ्याने हत्या केली आहे. ही घटना कुर्ल्यातील आर्टिरियल एलबीएस रोडवर सकाळी साडे बारा वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. मृताचे नाव छक्कन अली असं असल्याचं समोर आलं आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत मृत व्यक्तीवर एका व्यक्तीने हल्ला केल्याचं दिसून आलं आहे. गुन्हे शाखेचे पथक आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस तपासात हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव सैफ जाहिद अली असल्याचं समोर आलं असून तो कपड्याच्या कारखान्याच्या त्याच युनिटमध्ये हेल्पर म्हणून काम करत असल्याची माहिती आहे.
या हत्येच्या घटनेनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी सैफ अलीला सोमवारी सायंकाळी कल्याण रेल्वे स्थानकावरुन अटक केली. त्याने पोलिसांच्या तपासात सांगितले की, ऑटोरिक्षाचे भाडे देण्यावरून त्या दोघांमध्ये भांडण झालं होतं. २५ रुपयांच्या भाड्यावरुन हा वाद झाला होता. त्यानंतर त्याने छक्कनवर हल्ला केला. परिणामी छक्कन अलीचा मृत्यू झाला. पुढील कारवाईसाठी पोलिसांनी त्याला कुर्ला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. खुनाच्या आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, छक्कन अलीने सहप्रवासी सैफ जाहीद अलीने रिक्षाचं २५ रुपये भाडं देण्यास सांगितलं. सैफने नकार दिला आणि छक्कनने पैसे द्यावे असं सांगितलं. या कारणावरुन त्यांच्यात भांडण झालं. मारहाणीत छक्कनच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सैफ अली हा उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला कल्याण रेल्वे स्थानकावरुन अटक केली. सुरुवातीला या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आता या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.