जिंतूर विधानसभा मतदारसंघ हा मागील दहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांनी जिंतूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत आपली कारकीर्द सुरू केली. पण २०१९ मध्ये विजय भांबळे यांचा भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी पराभव केला. विजय भांबळे यांचा ३००० मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाला सुटणार असल्याची चर्चा होती. मागील पाच वर्षापासून विजय भांबळे हे या मतदारसंघात तयारी करत आहेत. निसटता पराभव झाला असला तरी विजय भांबळे यांनी मतदारसंघातील आपला संपर्क कमी होऊ दिला नाही.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून चांगलीच उलथापलथ झाली. त्याचे पडसाद जिंतूर विधानसभा मतदारसंघातही उमटले. जिंतूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या ओबीसी कार्यकर्त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर या ओबीसी नेत्याचा प्रचार केला. त्यामुळे जिंतूर विधानसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू झाला. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर निवडून आलेले खासदार संजय जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात काम करणाऱ्या जिंतूर येथील काँग्रेसच्या ओबीसी पदाधिकाऱ्यांची तक्रार नाना पटोले यांच्याकडे केली आहे. या पदाधिकाऱ्यांवर काँग्रेसने कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली.
जिंतूरच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मात्र विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे यांनी आपल्या शिष्टमंडळासह काल झालेल्या नांदेड येथील आढावा बैठकीमध्ये चांगलेच शक्ती प्रदर्शन केले. राज्यामध्ये ओबीसींवर अन्याय नको, आमचा जिंतूर विधानसभा मतदारसंघ ओबीसी बहुल आहे, तसेच हा परंपरागत काँग्रेस विचारधारेचा आहे. त्यामुळे जिंतूर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडून घ्यावी आणि तेथून सुरेश नागरे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली.
एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजय भांबळे यांनी आपल्या प्रचाराचा जोर धरला असला तरी दुसरीकडे काँग्रेसकडून मात्र या विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिंतूर विधानसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटेल हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये समझोता झाला तरच महाविकास आघाडीचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून येऊ शकतो. जर महाविकास आघाडीत बिघाडी झाली तर मात्र महाविकास आघाडीला याचा चांगलाच फटका देखील बसू शकतो.