भंडाऱ्याजवळील भिलेवाडा आणि भंडारा शहरातील साई प्लाझा येथे भाजप ग्रामीण कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते उल्हास फडके, माजी आमदार बाळा काशिवार, जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा तालुकाध्यक्ष विनोद बांते, जिल्हा महामंत्री आशू गोंडाणे आदी उपस्थित होते.
भंडारा विधानसभेत शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर हे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत लढण्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांकडून भाजप उमेदवाराला सहकार्य करण्यात आले नाही. त्यामुळे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. भंडाऱ्याच्या जागेवर भाजपनेच लढावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या वाढत्या मागणीने आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी सहकार्य केले नसल्याने भाजपचा पराभव झाला. भंडारा आणि पवनी येथे भाजपच्या बुथ कमिट्या सक्षम असल्याने भंडारा विधानसभेची जागा भाजपलाच मिळावी, असा ठराव पारित करून वरिष्ठांना पाठविला आहे.
-विनोद बांते, भंडाऱ्याचे भाजप तालुकाध्यक्ष