रेखा नारायण घुगे या निमोण ता. संगमनेर जिल्हा. अहमदनगर इथे राहणाऱ्या आहेत. लग्न झाल्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी, मुलीचं संगोपन हे प्राधान्य होतं. मात्र लग्न झालं असलं, तरी त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची होती. लहानपणापासून त्यांना शिक्षणाचं वेड होतं. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यासाठी त्यांनी पीएसआय होण्याचा निर्णय घेतला. पण घर-संसार, कुटुंब, मुलं साभांळून अभ्यास करणं मोठं आव्हान होतं.
एमपीएससीचा अभ्यास करताना समोर आलेल्या आव्हानांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, एमपीएसचा अभ्यास करताना अनेक आव्हानं होती. त्यांचे पती सिन्नरला नोकरीला असल्याने त्याही तिथे स्थायिक होत्या. मात्र सिन्नर ग्रामीण भाग असल्यामुळे एमपीएससाठीच्या क्लोसेसचा तिथे अभाव होता. तसंच मार्गदर्शनही नव्हतं. तसंच लहान मुलगी असल्याने पुणे, मुंबई सारख्या शहरात जाऊन अभ्यास करू शकत नव्हते. त्यामुळे सिन्नरमध्ये राहूनच स्पर्धा परिक्षेची तयारी केली.
रेखा घुगे संसार सांभाळत, सून, बायको आणि आई या जबाबदाऱ्या पार पाडत अभ्यास करत होत्या. तसंच त्यांच्या कुटुंबाने त्यांना मोठं सहकार्य केलं. जसं एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, तसंच एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचाही हात असतो, असं त्या म्हणतात. त्याप्रमाणे पती पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने या पदाला गवसणी घालू शकले, असं त्या सांगतात.
एमपीएसची तयारी करताना २०२० आणि २०२१ मध्ये त्यांनी परीक्षा दिली पण त्यात त्यांना अपयश आलं. पण रात्रीनंतर दिवस उजाडतोच त्याप्रमाणे त्यांनी अपयशामुळे खचून न जाता पुन्हा जोमाने अभ्यास केला. २०२२ मध्ये परीक्षा दिली आणि त्यात त्या यशस्वी झाल्या.
‘मी माझ्यासारख्या अनेक लग्न झालेल्या मुलींना ज्या स्पर्धा परीक्षा देतात त्यांना एकच सांगेन, तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा यश नक्कीच तुमचं असेल. जगाचा विचार करू नका, स्वतः काम करायचं ते ठरवा, लोक नाव ठेवणारच फक्त आपण आपल्या मार्गावर चालत राहण्याचा प्रयत्न करा. लोक नाव ठेवण्यात व्यस्त असतात, आपण नाव कमवण्यात व्यस्त असले पाहिजे’