मिरा-भाईंदरमधील नागरिकांना लगत असणाऱ्या मुंबईत जायचे म्हटले तर प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या रेल्वेने जावे लागते. तर, रस्तेमार्गे जाताना वाहतूककोंडीत अडकावे लागते. या हालातून सुटका व्हावी, म्हणून मेट्रो मार्गिका उभारून ती मुंबई उपनगराशी जोडण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात होती. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर सप्टेंबर २०१९मध्ये मिरा-भाईंदर-दहिसर मेट्रो ९ प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. या कामाला पाच वर्षे पूर्ण झाली असल्याने मेट्रो कधी सुरू होणार, असा प्रश्न मिरा-भाईंदरवासी विचारत आहेत.
या संदर्भात एमएमआरडीएकडून नुकतीच पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. यात त्यांनी मेट्रो प्रकल्पाचे बांधकाम ८७ टक्के पूर्ण झाले असून मेट्रो स्थानकांचे अंतर्गत कामकाज व मार्गिका टाकण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरीस प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशिगाव मार्गावर सेवा देण्याचा प्रयत्न असेल, असे नमूद करण्यात आले आहे. तर, काशिगाव ते नेताजी सुभाष चंद्र बोस मैदानापर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यातील सेवा डिसेंबर २०२५पर्यंत देण्याचा प्रयत्न असणार असल्याचे म्हटले आहे.
पहिल्या टप्प्यात मेट्रो सुरू झाल्यानंतर मिरा-भाईंदरकरांना पुढे दहिसर स्थानकातून मेट्रो बदलून अंधेरी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा पर्यंत प्रवास करत येणार आहे. तर, दहिसर-आनंद नगर मेट्रो स्थानकाची अंतर्गत जोडणी आवश्यक परवानगीअभावी रखडली आहे. त्यामुळे दहिसर स्थानकातून थेट अंधेरी पश्चिम (ओशिवरा) मार्गावर प्रवास करण्यासाठी नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तिसऱ्या टप्प्यासाठी मोठी प्रतीक्षा
मिरा-भाईंदर दहिसर मेट्रोचे काम पूर्वी दहिसर ते काशिगाव व काशिगाव ते नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान या दोन टप्प्यांत केले जाणार होते. परंतु आता राई गावातील प्रस्तावित मेट्रो कारशेड रद्द करून ते उत्तनच्या डोंगरी येथे उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात मार्गिका उभारण्याचे काम करावे लागणार आहे. हे काम अद्याप एमएमआरडीएकडून हाती घेण्यात आलेले नाही. अद्याप मार्गिका उभारण्याचा मार्गही निश्चित करण्यात आलेला नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात मेट्रोच्या सेवेसाठी आणखी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जुन्या आराखड्यानुसार माहिती
* मेट्रो मार्गिका क्रमांक ९
* मिरा-भाईंदर दहिसर मेट्रो मार्ग ११.३८ किमी
* प्रकल्पावरील एकूण खर्च सुमारे ११०० कोटी
* मेट्रो स्थानकांची संख्या ८