World Organ Donation Day: अवयवदानासाठी ‘इनहाउस कॉरिडॉर’ महत्त्वाचा; ‘इंडियन सोसायटी’कडून गाइडलाइन जाहीर

पुणे : अवयवदान वाढविण्यासाठी पुण्यासह देशभर मोहिमा राबविल्या जात आहेत. अवयवदानाबाबत जनजागृती होत असूनही दात्यांच्या अवयवांचे प्रत्यारोपणाचे प्रमाण कमीच आहे. ते वाढविण्यासाठी आता ‘इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसीन’ने (आयएससीसीएम) ‘इनहाउस ग्रीन कॉरिडॉर’ म्हणून रुग्णालयातील डॉक्टरांसाठी मार्गदर्शक सूचना (गाईडलाइन्स) तयार केल्या आहेत. रुग्ण ‘ब्रेनडेड’ (मेंदूमृत) जाहीर झाल्यापासून प्रत्यारोपण करेपर्यंत अवयवांची गुणवत्ता टिकावी; तसेच त्यातून अवयवदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी या सूचना उपयुक्त ठरणार आहेत.

अवयवदान वाढण्यासाठी गाइडलाइन

देशात अवयवदान चळवळ वेग घेत असली तरी अवयवदान करणाऱ्या ‘ब्रेनडेड’ दात्याचे सर्व अवयवांचे प्रत्यारोपण होत नाही. प्रत्यारोपण करेपर्यंत त्याच्या डोळे, हृदय, मूत्रपिंड, यकृत, त्वचा, फुप्फुस, आतडे यांसारख्या अवयवांची गुणवत्ता कायम राखण्याचे वैद्यकतज्ज्ञांसमोर मोठे आव्हान आहे. देशात १:३ इतक्या प्रमाणात सध्या अवयवदान होत आहे. अवयवदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी; तसेच ‘ब्रेनडेड’ रुग्णाच्या अवयवांची काळजी घेण्यासाठी ‘इनहाउस ग्रीन कॉरिडॉर’ म्हणून गाइडलाइन्स नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ‘आयएससीसीएम’च्या देशातील तज्ज्ञांनी एकत्रित येऊन गाइडलाइन तयार केल्या आहेत. ‘आयएससीसीएम’चे माजी अध्यक्ष डॉ. कपिल झिरपे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. राहुल पंडित, डॉ. सुषमा गुरव, डॉ. सुभाल दिक्षीत, डॉ. अतुल कुलकर्णी यांच्यासह देशातील डॉक्टरांनी गाइडलाइन तयार केल्या आहेत. रुग्णालयातील ‘ब्रेनडेड’ रुग्णाचे अवयव प्रत्यारोपणापर्यंत कसे टिकवून ठेवावे. त्याची गुणवत्ता कशी टिकवून राहावी यासाठी रुग्णालयात ‘इनहाउस’ प्रयत्न करण्याची गरज या ‘गाइडलाइन’द्वारे स्पष्ट करण्यात आली आहे.

‘ब्रेनडेड’ रुग्ण तत्काळ ओळखावा

रुग्णालयात एखादा ‘मेंदमृत’ अवस्थेतील रुग्ण आल्यास त्यावर उपचारानंतरही प्रकृती सुधारत नसेल, असा रुग्ण ‘ब्रेनडेड’ होणार असल्याचे डॉक्टरांनी तातडीने ओळखले पाहिजे. ते ओळखल्यास तज्ज्ञ डॉक्टरांना ‘ब्रेनडेड’ रुग्णाच्या शरिरातील अवयवांचा दर्जा टिकवण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात, याकडे ‘गाइडलाइन’मध्ये लक्ष वेधले आहे. रुग्ण ‘ब्रेनडेड’ झाल्यानंतर शरिरात विविध बदल होतात. त्या रुग्णाचे लघवीचे नियंत्रण सुटते. रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब वाढतो. ऑक्सिजन पातळीही वाढते. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांना ‘इनहाउस ग्रीन कॉरिडॉर’च्या माध्यमातून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असते, असेही सूचित करण्यात आले आहे.

‘गाइडलाइन’ काय आहेत?

– दात्याच्या अवयवांची गुणवत्ता टिकवून ठेवावी
– ब्रेनडेड दात्याच्या रक्ताची पातळी, लघवीवर नियंत्रण करावे
– रक्तदाब नियंत्रित झाल्यास अवयवांची गुणवत्ता टिकून अधिकाधिक अवयवांचे प्रत्यारोपण शक्य
– रुग्ण हा ब्रेनडेड होणार हे लक्षात आल्यास त्याचे अवयव टिकवून ठेवण्याची प्रक्रिया सुरू करता येते
– ब्रेनडेड रुग्णाच्या अवयवांचे व्यवस्थापन कसे करणार, याची माहिती
– सलाइन कधी देणार, किती प्रमाणात देणार याकडे लक्ष द्यावे लागेल
– शरिरातील सोडियमचे प्रमाण कसे टिकविणार याकडे लक्ष द्यावे
– या सर्व प्रक्रिया १२ तासांच्या ‘टाइमलाइन’मध्ये करण्याचे डॉक्टरांपुढे आव्हान

एका रुग्णाचे दहा अवयवांचे प्रत्यारोपण झाले, असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात दोनच अवयवांचे प्रत्यारोपण होते. अवयव प्रत्यारोपणांचे हे प्रमाण वाढविण्यासाठी ‘आयएससीसीएम’ने ‘गाइडलाइन’ तयार केल्या आहेत. त्या पुण्यासह देशातील अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या रुग्णालयांसह डॉक्टरांना उपयुक्त ठरतील. त्याची अंमलबजावणी केल्यास डॉक्टरांना ‘ब्रेनडेड’ रुग्णाचे अधिकाधिक अवयवांचे प्रत्यारोपण शक्य होईल. अनेकांना अवयव मिळतील.- डॉ. कपिल झिरपे, माजी अध्यक्ष, ‘आयएससीसीएम’

Source link

brain dead organ donationindian society of critical care medicineInhouse Green CorridorISCCMWorld Organ Donation DayWorld Organ Donation Day 2024अवयवदान प्रक्रियाअवयवदानाचे महत्व
Comments (0)
Add Comment