फडणवीस सांगतात, भुजबळ बोलतात
फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच भुजबळ बोलतात. ऐकले नाही, तर ते पुन्हा तुरुंगात टाकतील, अशी भुजबळांना भीती वाटते. त्यांची पंचाईत झाली आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. फडणवीसांनी राजकारणात अनेकांचा कार्यक्रम केला; मात्र त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणारा मी एकटाच वस्ताद त्यांना भेटलो असेल. कोणी कितीही डावपेच केले, षडयंत्र आखले तरी ओबीसीतूनच मराठा आरक्षण मिळवून देऊ, असे आश्वासन जरांगे यांनी दिले.
भुजबळांना येवल्यातून पाडायचे
छगन भुजबळांनी शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवला. त्यामुळे फडणवीस भुजबळांच्या नादी लागल्यास भाजपही संपेल, असा इशारा देतानाच, भुजबळांच्या रुपाने नाशिक जिल्ह्याला लागलेली साडेसाती संपवायची आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. लोकसभा निवडणुकीत आपण अनेकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. ‘एक’ तर नाशिकमध्ये उभाच राहिला नाही, असे सांगत त्यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला. येवला पवित्र करायचे असल्याने, येत्या निवडणुकीत भुजबळांना पाडा, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.
नारायण राणेंविरोधात बोलू नका
भाजप खासदार नारायण राणेंचा मी सन्मान करतो. राणे यांचे समाजाप्रति असलेले योगदान आणि त्यांच्या वयाचा विचार करता, त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका करू नका, असे जरांगे यांनी सांगितले. अर्थातच, राणे यांनी टीका करण्याची मर्यादा ओलांडली आणि वारंवार सांगूनही त्यांना आपला सन्मान ठेवला नाही, तर त्यांचे काय करायचे, ते मी पाहून घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.
२९ ऑगस्टला अंतरवालीला या
मराठा आणि कुणबी एकच असल्याचे सिद्ध झाले आहे. दहा टक्के आरक्षण मागितले नव्हते. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे. ईडब्ल्यूएसचा लाभ माझ्यामुळे गेल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत भावनाशील होऊन नेत्यांच्या नादाला लागू नका. तसे केले तर आरक्षण परत कधीच मिळणार नाही. निवडणूक लढवायची, की निवडणुकीत पाडायचे हे ठरविण्यासाठी येत्या २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीत या, असे जरांगे-पाटील म्हणाले. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी २० ऑगस्टपर्यंत माहिती पाठविण्यासही त्यांनी सांगितले.
मराठा आणि कुणबी एकच असल्याचे सिद्ध झाले आहे. दोन्ही समाजात कुठलाही वाद होऊ देऊ नका. राज्यात काहीही झाले तरी आपण शांतता राखायची आहे.– मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणाचे नेते