पिंपरी चिंचवड येथे रविवारी होणाऱ्या आत्मसन्मान यात्रेच्या सभा स्थळाची पाहणी पार्थ पवार यांनी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना हा खुलासा केला आहे. त्यांनी अनेक राजकीय विषयांवर देखील चर्चा केल्या.
लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पार्थ पवार आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे. या शहरात गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार हे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अनेक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेताना देखील ते बघायला मिळतात. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील पूरग्रस्त भागाचा दौरा करत पूरस्थितीचा आढावा देखील घेतला होता. त्यानंतर त्यांनी शहरातील पक्ष कार्यकारिणीची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा देखील केली होती.
मी आता कोणतीही निवडणूक लढावणार नसून मला पक्ष बांधणी करायाची आहे, पक्षाला पुढे घेऊन जायचे असल्याचे देखील पार्थ पवार म्हणाले आहेत. तसेच आम्ही पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा जागा लढवण्यासाठी आग्रही आहोत, कारण पिंपरी चिंचवड शहरांमध्ये या दोन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद जास्त आहे, असंही पार्थ म्हणाले.
पिंपरी आमचा पूर्वीपासूनच मतदारसंघ आहे तर चिंचवड विधान मतदारसंघामध्ये आम्हाला पोटनिवडणुकीत चांगल्या पसंतीची मतं मिळाली होती. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आम्ही या मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली असल्याचे देखील पार्थ पवार म्हणालेत.
युगेंद्र पवारला साहेबांनी संधी दिली तर तो लढेल?
माझा भाऊ युगेंद्र पवार याला विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. तो माझ्यापेक्षा मोठा आहे, पवार साहेबांनी त्याला संधी दिली तर तो निवडणूक लढवेल, मात्र, तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. मी या संदर्भात काहीही बोलणं उचित राहणार नाही, असं पार्थ पवार म्हणाले.