कर्जतमध्ये झळकले ‘सुपारीबाज’ फलक, काँग्रेसचे उत्तर तर मनसेने घेतले अंगावर; पुढील अपडेट १६ ऑगस्टला…

अहमदनगर (विजयसिंह होलम) : कर्जत शहरात सुपारी आणि लाकडी बाज यांचे चित्र वापरत ‘सुपारीबाज’ असा अर्थबोध होऊ शकेल असे फलक झळकले आहेत. फलक कोणी लावले? कोणाविरूद्ध लावले, त्याचा उद्देश काय? हे मात्र यावरून स्पष्ट होत नाही. मात्र, या कृतीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसलाही चांगलाच राग आल्याचे दिसून येते. काँग्रेसचे श्रीहर्ष शेवाळे यांनी या मागे राजकारण असल्याचे आरोप करीत नाव जाहीर करण्याची मागणी केली. तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी थेट आमदार रोहित पवार यांचे नाव घेत टीका केली आहे. एवढेच नव्हे तर या मतदारसंघातून मनसे निवडणूक लढविणार असल्याचे आव्हानही दिले आहे. फलकावर नमून केल्याप्रमाणे पुढील खुलासा १६ ऑगस्टला करण्यात येणार आहे. त्याकडे आता लक्ष लागले आहे. अर्थात फलक लावणाऱ्याने हा शब्द नेमका कोणाला उद्देशून वापरला? हे स्पष्ट होत नाही.

कर्जत शहरात काळ्या रंगाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यावर कर्जत जामखेड समाचार, लवकरच घेऊन येत आहोत, असा मजकूर आहे. त्याखाली सुपारी आणि लाकडी बाज यांची चित्र देण्यात आली आहे. पुढील अपडेट १६ ऑगस्टला… असे त्याखाली लिहिले आहे. यातील चित्रावरून त्यांना ‘सुपारीबाज’ हा शब्द वापरायचा आसल्याचे दिसून येते. मात्र, हा शब्द राज्यस्तरावरील संदर्भाने आणि की स्थानिक पातळीवरील संदर्भ आहे, त्यामुळे हा काँग्रेसबद्दल की मनसेबद्दल हे स्पष्ट होत नाही. राज्यस्तरावर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात वाद आहे. मराठवाड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनावर सुपाऱ्या फेकण्याचे आंदोलन झाले होते. तर स्थानिक पातळीवर काँग्रेसने विद्यमान आमदार रोहित पवार यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे अड. कैलास शेवाळे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन यावेळी पवार यांना बारामतीमधून उमेदवारी द्यावी आणि ही जागा काँग्रेसला सोडून शेवाळे यांना उमेदवारी द्यावी, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. त्यामुळे आरोप केला जात असल्याप्रमाणे पवार यांच्या समर्थकांनी जर हे फलक लावले असतील, तर त्यांनी काँग्रेसला की मनसेला डिवचण्यासाठी ते लावले आहेत, हे स्पष्ट होत नाही.

यावर बोलताना काँग्रेसचे श्रीहर्ष शेवाळे यांनी म्हटले आहे की, कर्जतकराच्या स्वाभिमानाला कोणी डिवचू नये. राजकारणात इच्छा व्यक्त करण्याचा सर्वांना अधिकार असतो. फलक लावणाऱ्यांनी सुपारीबाज कोण आहे, याचे नाव स्पष्ट केले असते तर आम्ही त्यांचे कौतूक केले असते, असे शेवाळे यांनी म्हटले आहे.

मनसेचे वर्मा यांनी थेट रोहित पवार यांचे नाव घेऊन कडक शब्दांत टीका केली आहे. वर्मा यांनी म्हटले आहे, आंधळं दळदंय अन् कुत्रं पीठ खातंय अशी परिस्थिती कर्जत जामखेडची झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी कोणाविरूदध काय बोलावे या आधी विचार करण्याची गरज आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्याविरूद्ध बोलणे शोभत नाही. आमचे मोहोळ उठले तर पळता भुई थोडी होईल. खरं तर मतदार संघ राखणे तुम्हाला अवघड आहे. या वेळी आणि आमच्या आता नादाला लागलेच आहात तर विधानसभा निवडणूक दूर नाही. तुम्हाला बरोबर आमची ताकद दाखवून देऊ. आजोबाच्या किर्तीवर तुमची मुर्ती आहे बाकी तुमचे स्वतः चे अस्तित्व तरी काय? लोकांना निवडणूकीआधी पाणी पाजले तर लोकांना वाटले चांगला माणूस आहे, गरज ओळखतो. पण इथे गड्याच्या डोक्यात काय पिकत होते, कुणास तिळ मात्र शंका आली नाही. जशी निवडणूक झाली जेसीबी मधून गुलालाची उधळण झाली तशी कर्जत जामखेडला उतरती कळा लागली. एका मागोमाग मतदारांच्या डोळ्यात धुळफेकीचे एक खेळ सुरू झाले. या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाणी पाजल्या शिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो, असे वर्मा यांनी म्हटले आहे.

Source link

hoarding in karjat citymaharashtra assembly election 2024maharashtra politics latest newsVidhan Sabha Nivadnukआमदार रोहित पवारकर्जत विधानसभा मतदारसंघकाँग्रेसमहाराष्ट्र नवनिर्माण सेना
Comments (0)
Add Comment