पाच लाख रुपयांच्या जाचमुचलक्यासह आठवड्यातून एकदा पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालयाने अद्वय हिरे यांना जामीन दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अद्वय हिरेंना जामीन मिळाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू आहेत. शिवसेना नेते तथा मंत्री दादाजी भुसे यांच्याविरोधात अद्वय हिरे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या तुरुंगातून बाहेर येण्याने नाशिकच्या राजकारणात मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो.
नेमके प्रकरण काय होते?
डॉ. हिरे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून २०१२ मध्ये मालेगाव येथील रेणुकादेवी सूतगिरणी संस्थेसाठी घेतलेले तीन कोटी ४० लाखांचे कर्ज थकविले होते. या प्रकरणात हिरे यांच्याकडे बँकेचे एकूण ३५ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज थकले होते. कर्ज थकविल्याप्रकरणी डॉ. हिरे यांच्यासह इतरांवर मालेगावच्या रमजानपुरा पोलिस ठाण्यात बँकेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात डॉ. हिरे यांना भोपाळ येथून १३ नोव्हेंबर २०२३ रोजी अटक झाली होती. तेव्हापासून हिरे हे पोलिस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत होते.
हिरे यांनी जामिनासाठी अर्ज केले होते. मात्र, त्यांना जामीन मिळत नव्हता. त्यामुळे हिरे यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हिरे यांना ५ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यासह आठवड्यातून एकदा पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला.
रेणुकादेवी सूतगिरणी कर्ज थकविल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे हे न्यायालयीन नोव्हेंबर २०२३ पासून कारागृहात होते.