याविषयी विस्तृत माहिती अशी की, पाथरी पोलीस ठाण्यात मयत वृद्धाचा मुलगा अजयसिंह पात्रीकर यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की १२ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास त्यांचे वडील बाळकृष्ण शंकरराव कांबळे हे शेतात गेले होते. पाथरी जवळ माळीवाडा शिवारात आखाड्यावर कोंबड्या आणि बदकांना चारा पाणी करून ते रात्री दहा वाजेपर्यंत घरी नेहमी परतायचे. पण १२ ऑगस्ट रोजी ते घरी परतलेच नाही. १३ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना फोन केला असता, त्या फोनला देखील त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुलगा अजयसिंह हा शेतात गेला तिथे त्यांचे वडील मृत अवस्थेत पडलेले त्यांना दिसले.
मयत बाळकृष्ण कांबळे यांचा मृतदेह पाथरी येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आला. तेथे पंचनामा करण्यात आला. यावेळी मयताच्या पॅन्टच्या खिशामध्ये चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीमध्ये माजी आमदार अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्राणी उर्फ बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जुलै व ऑगस्ट महिन्यात दोन सविस्तर तक्रारी दिल्या होत्या. तसेच उपलेखायुक्तांकडेही २०२१ पासून दोन ते तीन तक्रारी दिल्या होत्या. स्वार्थी राजकीय नेता आणि तत्त्वहिन कार्यकर्ते यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे.
दरम्यान, अजयसिंह यांच्या तक्रारीवरून पाथरी पोलीस ठाण्यामध्ये बीएनएस १०८ अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम १९८१ नुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पाथरी शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली. एकीकडे विरोधक माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना अटक करण्याची मागणी करत आहेत तर दुसरीकडे दुर्राणी यांचे समर्थक मात्र हा गुन्हा राजकीय द्वेषातून करण्यात आला असल्याचे सांगत आहेत.
पाथरी शहरात कडकडीत बंद
दरम्यान, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे पडसाद पाथरी शहरासह जिल्ह्यात उमटले. बुधवारी संध्याकाळी गुन्हा दाखल झाला आणि त्याची चर्चा वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली. पाथरी शहरातील व्यापाऱ्यांनी या घटनेचा निषेध म्हणून आज दिवसभर पाथरी शहर कडकडीत बंद ठेवले. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना जाणून बुजून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी व्यापाऱ्यांनी देखील सांगितले.
हे तर माझ्याविरुद्ध रचलेले राजकीय षडयंत्र – माजी आमदार बाबाजानी दुर्राणी
मयत बाळकृष्ण हा कधी काळी माझा कार्यकर्ता होता. त्याला मी पाथरीच्या निराधार समितीचा अध्यक्ष देखील बनवले होते. पण वर्षभरापूर्वी तो मला सोडून शिवसेना शिंदे गटामध्ये सामील झाला. मागील वर्षभरापासून त्याचा आणि माझा कसल्याही प्रकारचा संबंध राहिलेला नव्हता. किंवा त्याच्यासोबत कधी वादही झाला नाही. पण तो ज्या पक्षात गेला आहे त्या पक्षातील काहीजणांनी त्याला हाताशी धरून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले आहे. तपासामध्ये ते समोर येईलच. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शिवस्वराज्य यात्रा दोन दिवसांत परभणी जिल्ह्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी साधलेला हा डाव असल्याचे बाबाजानी दुर्राणी म्हणाले. यापूर्वीही वेगवेगळ्या तीन गुन्ह्यांमध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही दुर्राणी म्हणाले.