आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘मी पुन्हा येईन’ म्हणताना दिसत नाही. महायुती पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास सत्ताधाऱ्यांना आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात विधानसभा निवडणूक लढवली जाईल असंही ठामपणे सांगितलं जाईल. पण निकालानंतर तेच मुख्यमंत्री होतील का, त्यांच्याकडेच नेतृत्त्व असेल का, यावर कोणीही बोलत नाही.
सध्याच्या घडीला महायुतीनं समन्वयावर भर दिला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीत जागावाटपावरुन बरीच रस्सीखेच झाली. उमेदवार जाहीर होण्यास विलंब झाला. त्याचा फटका महायुतीला निवडणुकीत बसला. त्यामुळे विधानसभेला महायुतीनं सगळं लक्ष अधिकाधिक जागा निवडून आणण्यावर केंद्रीत केलं आहे. महायुतीच्या भव्य सभांना २० ऑगस्टपासून सुरुवात होईल. कोल्हापूरमध्ये पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणात महायुतीच्या ९ सभा होणार आहेत.
लोकसभेला भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना फारशी मदत केली नव्हती. दोन्ही पक्षांचं मतदान एकमेकांकडे वळलं नाही. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला. त्यामुळे याकडे महायुतीनं अधिक लक्ष दिलं आहे. भाजपनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत झालेले मतभेद बाजूला ठेवत बैठकांचा धडाका लावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गेल्या महिन्याभरात तीनवेळा संघ मुख्यालयात जाऊन पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. संघ, भाजपमधील समन्वय राखण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही १०० चा आकडा पार करण्याचं उद्दिष्ट भाजपनं ठेवलं आहे. मित्रपक्षांसह २०० पार जाण्याचा त्यांचा मानस आहे. आधी निवडणूक जिंकू. मग मुख्यमंत्रिपदाचं बघू, अशी भूमिका महायुतीमधील तीन पक्षांची आहे. आताच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केल्यास अन्य पक्षातील नेते नाराज होतील. त्याचा फटका महायुतीला बसेल, अशी भीती सत्ताधारी पक्षातील वरिष्ठांना वाटते.
महाविकास आघाडीतील तीनपैकी दोन पक्षांची भूमिकाही अशीच आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचं उमेदवार जाहीर करण्यात यावं यासाठी खासदार संजय राऊतांची सातत्यानं बॅटिंग सुरु आहे. पण काँग्रेस, शरद पवार गटानं महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा म्हणत ठाकरेंची मागणी धुडकावली आहे. ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्यास दोन्ही मित्रपक्ष तयार नाहीत. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निकालानंतर घेऊ अशी काँग्रेस, शरद पवार गटाची भूमिका आहे.
लोकसभेला विरोधकांनी पंतप्रधानपदाचा चेहरा दिलेला नव्हता. तरीही इंडिया आघाडी २४० पर्यंत पोहोचली हा अनुभव ताजा आहे. त्यात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिल्यास निवडणूक व्यक्तीकेंद्रित होईल आणि शिंदेसेना, भाजपला हिंदुत्त्वावरुन त्यांना लक्ष्य करणं सोपं जाईल, असं महाविकास आघाडीतील दोन पक्षांना वाटतं. ठाकरेंना अधिक महत्त्व देऊन त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढू देण्याची जोखीम काँग्रेस, शरद पवारांना पत्करायची नसल्याचं दिसतं.
लोकसभेतील उद्धवसेनेची कामगिरी महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांपेक्षा खराब राहिली आहे. काँग्रेसनं १७ पैकी १३, तर शरद पवार गटानं १० पैकी ८ जागा निवडून आणल्या. तर सर्वाधिक २१ जागा लढवून ठाकरेंना केवळ ९ जागा मिळाल्या. ही आकडेवारी पाहता लोकसभेप्रमाणे विधानसभेला काँग्रेस, शरद पवार गट ठाकरेसेनेचे हट्ट पुरवण्याच्या मानसिकतेत नाही.