‘२०१४ मध्ये सुरेश गोरे अपघाताने निवडून आले’
२०१४-२०१९ या पंचवार्षिकमध्ये शिवसेनेच्या सुरेश गोरे यांनी खेड-आळंदी विधानसभा नेतृत्व केले. तर २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत सुरेश गोरे यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या देशमुख यांच्यावर शिवसैनिकांची नाराजी होती. यातच अतुल देशमुख आता म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत सुरेश गोरे अपघाताने निवडून आले. त्याचा साक्षीदार मी आहे, ती आमची चूक आता आमच्या लक्षात आली आहे. देशमुखांनी असे म्हणत रामदास ठाकूर यांच्या वक्तव्याला दुजोरा देऊन शिवसेनेला एकप्रकारे डिवचले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. त्यातच अतुल देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नाराजीचा सुर उमटत आहे.
भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलेल्या देशमुखांवर नाराजी
महाविकास आघाडीचे सरकार असताना पंचायत समितीच्या सत्ता नाट्यावरुन आमदार दिलीप मोहिते आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये वाकयुध्द रंगले होते. त्यावेळी खेड तालुक्याचा पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असेल अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती. आता पुन्हा भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या अतुल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे. यापूर्वी देखील अतुल देशमुख यांच्या प्रवेशावर महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता देशमुखांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसैनिकांच्या काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.