त्यानंतर महापालिकेने मरिन ड्राइव्हचे सुशोभिकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले. याचा आराखडा महापालिकेने तयार केला. मरिन ड्राइव्हवरील सी-फेसिंग इमारतींना विशिष्ट रंग देण्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टची निवड केली. त्याबाबत बैठकाही पार पडल्या. मात्र त्यानंतर काम पुढे सरकलेच नाही. व्ह्यूइंग डेकसाठी निविदा मागवल्या होत्या. मरिन ड्राइव्हच्या समुद्रात लेझर शो करणे शक्य आहे का याची चाचपणीदेखील केली जात होती. या कामासाठी सल्लागाराची नियुक्तीही करण्यात आली. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात या कामांना सुरुवात करतानाच, डिसेंबर २०२३पर्यंत ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र त्यानंतर काहीच हालचाली झाल्या नाहीत.
मरिन ड्राइव्हचे शेवटचे टोक असलेल्या एनसीपीएसमोरचे काम मुंबई महापालिकेच्या ए वॉर्डकडून, तर उर्वरित काम महापालिकेच्या हेरिटेज विभागाकडून केले जाणार आहे. ए वॉर्डकडून व्ह्यूइंग डेक, आसनव्यवस्था आणि प्रसाधनगृहे उभारली जाणार असून त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून या प्रकल्पाचा आढावा घेण्यात येत आहे. सल्लागाराकडून अहवाल सादर झाल्यानंतरच पुढील कामे केली जाणार आहेत. या कामासाठी ४७ कोटी ७४ लाख रुपये खर्च आहे.
– एका टप्प्यातील कामासाठीच सल्लागाराची नियुक्ती
– उर्वरित एक किमीचे काम हेरिटेज विभागाकडे
– त्याबाबत अद्यापही हालचाली नाहीत
निधीचा अभाव
ए वॉर्डकडून मरिन ड्राइव्हच्या एनसीपीएसमोरील काम, तर हेरिटेज विभागाकडून मरिन ड्राइव्हच्या उर्वरित एक किमी अंतराचे काम केले जाणार आहे. या कामासाठी साधारण १५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र निधीअभावी हे काम रखडले आहे. यातील ४७ कोटी ७४ लाख रुपये खर्च महापालिका करणार असून, उर्वरित निधी जिल्हा वार्षिक नियोजन समितीकडून मिळवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.