समृद्धी महामार्गाचे मुंबईकडील टोक हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील आमने या गावी आहे. याच आमनेहून वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे जाणार असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे हा मुंबई-दिल्ली बहुउद्देशीय कॉरिडॉरचा भाग आहे. यामुळेच आमने येथे समृद्धी महामार्ग संपल्यावर एक जोड रस्ता पकडून वाहनचालकांना थेट वसई, विरार, डहाणू, सुरतमार्गे वडोदरा व तेथून विनाअडथळा पुढे दिल्ली गाठता येणार आहे.
एनएचएआयचे प्रादेशिक महाव्यवस्थापक अंशुमणी श्रीवास्तव यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले की, ‘समृद्धी महामार्गाचे आमने हे अखेरचे टोक वास्तवात वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वेवरच आहे. हा एक्स्प्रेस वे पूर्णपणे नव्याने उभारला जात असून मुंबई मुख्यालयांतर्गत असलेल्या सर्व १०३ किलोमीटरच्या कामासाठी कंत्राटदार नियुक्त झाला आहे. त्यांनी कामदेखील सुरू केले आहे. जून २०२५पर्यंत हे काम पूर्ण होईल.’
समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा सप्टेंबरअखेरीस पूर्ण होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हटले आहे. एनएचएआयकडून वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वेचे काम जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानुसार समृद्धी महामार्ग ते दिल्ली (मार्गे वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे) ही संलग्नता पुढीलवर्षी जूनपासून उपलब्ध होणार आहे.
‘समृद्धी’ची पुढे जेएनपीटीशी जोडणी
वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे हा आमने येथून पुढे भोज व तेथून मोरबेपर्यंत (तळोजाची पूर्व बाजू) होणार आहे. तेथून पुढे राज्य रस्ते महामंडळाच्या रस्त्याने हा मार्ग जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापर्यंत (जेएनपीए) जाईल. यामुळे समृद्धी महामार्ग व त्याला संलग्न असलेले १४ जिल्हे हे उत्तरेकडे दिल्ली तर दक्षिणे-पश्चिमेकडे जेएनपीएटी बंदराशी जोडले जाणार आहेत.
बंदरासाठी १८ किमीचा मार्ग बांधणार
‘वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वेचा मोरबे ते जेएनपीए हा अखेरचा १८ किमीचा टप्पा राज्य रस्ते महामंडळाच्या विरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडॉरचा भाग आहे. त्यामुळे तो रस्ता आम्ही बांधू. तसेच आमने येथून एका बाजूने वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे व दुसऱ्या बाजूने सध्याच्या नाशिक महामार्गासाठी एकूण सहा किमी लांबीचा जोडरस्ता आम्ही बांधत आहोत. एकंदरीत समृद्धी महामार्गाला सर्व बाजूने संलग्नता दिली जात आहे,’ असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले.