अजित पवार काय म्हणाले?
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात उड्डाण पुलाचं उद्घाटन करण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आले होते. गाडीतून उतरल्यानंतर स्वागत करण्यासाठी आलेल्या आयुक्तांना अजित पवार शुभेच्छा देऊ लागले. मात्र आज १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्याऐवजी अजित दादांनी चुकून प्रजासत्ताक दिन असलं म्हटलं.
आपली झालेली गफलत अजित पवार यांच्या लागलीच लक्षात आली. त्यानंतर त्यांनी हसून चूक सुधारली आणि आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा असं म्हटलं. मात्र तोपर्यंत अजितदादांच्या झालेल्या गलती से मिस्टेकचा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला होता.
तीन दिवसात सव्वा कोटी महिलांच्या अकाऊंटवर तीन हजार
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज स्वातंत्र्या दिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना खुशखबर दिली आहे. येणाऱ्या १७ तारखेला म्हणजे तीन दिवसात सव्वा कोटी महिलांच्या अकाऊंटवर तीन हजार रुपये दिले जाणार आहेत, याचा मोठा कार्यक्रम पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियमवर होणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उपस्थित राहतील. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राज्य सरकरचा हा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सिंहगड रोडवर होत असलेल्या वाहतूक कोंडीला सोडवण्यासाठी उड्डाण पुलाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. या दरम्यान ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव अण्णा तापकीर, नगरसेवक प्रसन्न दादा जगताप, आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, पुणेकरांचं अभिनंदन करतो, कारण पुण्यात वाढत असलेली लोकसंख्या, आजूबाजूची गावं, आणि पुण्यात समाविष्ट झालेल्या नवीन गावांमुळे निर्माण होणाऱ्या पाण्याच्या समस्या, वाहतुकीच्या समस्या असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात अनेक ठिकाणी मेट्रोचं जाळं उभं करायचं आहे.
त्यानंतर अजित पवार म्हणाले, माय माऊलीला सफल करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशी योजना आम्ही आणली आहे. काल आम्ही ३५ लाख बहिणींच्या अकाउंटवर पैसे टाकले, आणि येत्या १७ तारखेला मोठा कार्यक्रम आम्ही करतोय, त्यासाठी मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री त्या कार्यक्रमात सहभागी असू. १७ तारखेला सव्वा कोटी महिलांच्या अकाउंटवर ३ हजार रुपये दिले जाणार आहेत. असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरुन संबोधन
दुसरीकडे, भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले. विकसित भारताचा संकल्प व्यक्त करताना युवकांच्या मनात चेतना जागवणारे भाषण मोदींनी केले. आम्ही राजकीय बळजबरीपोटी कोणताही निर्णय घेत नाही, आम्ही राजकीय गणिते बांधून निर्णय घेत नाही. आमचा एकच संकल्प आहे – प्रथम राष्ट्रहित, असे यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिलेच भाषण होते. त्यांनी सलग ११ व्यांदा पंतप्रधान म्हणून देशाला संबोधित केले. विशेष म्हणजे सकाळी साडेसात वाजता वरुणराजानेही लाल किल्ल्यावर उपस्थित लावत देशाला अभिवादन केले.