नंदुरबार शहरातील सोनी विहिरीजवळ गवळी कुटुंब गुण्यागोविंदाने राहतात. घरात ३ भावांची ६ मुलं, सुना व एक मुलगी असे २५ जणांचे कुटुंब एकत्रित राहतं. अशोक गवळी यांची मुलगी भाग्यश्री गवळीने १२ वी पास होताच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला आणि सात महिन्यांपूर्वी पोलीस भरतीची तयारी सुरू केली. नुकत्याच नंदुरबार पोलीस भरतीचा निकाल लागला असून नंदुरबार पोलीस दलात भाग्यश्री गवळीची निवड झाली. सामान्य कुटुंबातील युवतीने पहिल्याच प्रयत्नात पोलीस पदाला गवसणी घातल्याने कुटुंबीयांमध्ये मोठा आनंद आहे. गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा केला आहे.
समाजातील पहिली महिला सरकारी नोकरीत
नंदुरबार शहरात गवळी समाजाचे सुमारे २०० हून अधिक घरं आहेत. या छोट्याशा गावातली गवळी समाजातील भाग्यश्री सरकारी नोकरी मिळवणारी पहिली महिला असल्याचे गवळी समाजाचे युवा समन्वयक महादू हिरणवाळे यांनी सांगितले. दरम्यान भाग्यश्रीच्या कुटुंबात २५ सदस्य असून तिचे काका नगरपालिकेत कार्यरत आहेत. त्यांच्यानंतर कुटुंबात सरकारी नोकरीत निवड झालेली ती पहिली महिला सदस्य आहे.
भावांचे अधुरे स्वप्न भाग्यश्रीने केले पूर्ण
भाग्यश्री गवळी हिच्या कुटुंबातील चुलत भावाचे पोलीस दलात जाण्याचे स्वप्न होते. तो सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. त्याचे मार्गदर्शन तिला मिळाले. भावाने पोलीस दलात जाण्याचे अधुरे स्वप्न तिने पूर्ण केले आहे. गवळी हे सर्वसामान्य कुटुंब असून घरातील सदस्य शहरातील विविध ठिकाणी नाश्त्याचा व्यवसाय करतात. दरम्यान भाग्यश्री गवळी हिची पोलीस दलात निवड झाल्यानंतर भावाने तिच्या अंगावर गोणी भर गुलाल टाकला तसेच फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. याचा आनंदमयट क्षणाचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केला जो क्षणाकच प्रचंड व्हायरल झाला. अवघ्या वीस तासातच तो व्हिडिओ चार मिलियन लोकांनी पाहिला. पोलीस कर्मचारीपदी निवड झाली असली तरी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे स्वप्न असल्याचे भाग्यश्री गवळीने बोलून दाखवले आहे.