ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याचे सांगितले जात असले, तरी या भेटीत कोणत्या राजकीय चर्चा झाल्या का याचा तपशील मात्र समजू शकलेला नाही. आपल्या मित्रांनाही पवार साहेबांना भेटायचं होतं. ऑस्ट्रेलियाला जाण्याअगोदर आपली भेट झाली होती. पवार साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं आणि म्हणूनच आल्यावरही आम्ही शरद पवारांची भेट घेतली, अशी माहिती अनिरुद्ध निकम यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली.
दरम्यान, अनिरुद्ध निकम भविष्यात राजकारणात येण्याचा विचार करत आहेत का, असा प्रश्न यावेळी विचारला असता, त्यांनी सांगितलं की आपला राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. तशी कोणतीही शक्यता नाही. मी राजकारणामध्ये कधीच सक्रिय नसतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे या भेटीनंतर अनिरुद्ध निकम हे राजकीय वर्तुळात एन्ट्री करणार का या प्रश्नालाही तूर्तास विराम मिळाला आहे.
चिपळूण विधानसभेचे राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे आमदार शेखर निकम यांचे वडील माजी खासदार गोविंदराव निकम व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. हे सबंध निकम यांच्या तिसर्या पिढीत अनिरुद्ध यांनीही सांभाळले आहेत. शरद पवारांनी आपल्या भेटीत अनिरुद्ध यांच्याजवळ वडील आणि विद्यमान आमदार शेखर यांचीही आपुलकीने चौकशी केल्याची माहिती आहे.
निकम यांच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्याचीही त्यांनी माहिती घेतली. ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी जाण्याअगोदर अनिरुद्ध निकम यांना शरद पवार यांनीच युनिव्हर्सिटीची माहिती दिली होती. त्यामुळे तिकडून परतल्यानंतर त्यांना आपण काम करत असलेल्या प्रोजेक्ट्स संदर्भात माहिती दिली. ही भेट पूर्वनियोजित होती त्यामुळे या भेटीमध्ये विशेष असं काहीच नाही. मी केवळ आमदार शेखर निकम यांचा मुलगा असल्याने या भेटीची वेगळी चर्चा होत आहे. माझ्याबरोबर काही माझे मित्रही होते. त्यांनाही ऍग्रो केमिकल, शुगर केमिकल फॅक्टरी या संदर्भात काही प्रॉडक्टची माहिती द्यायची होती चर्चा करायची होती यासाठीही भेट होती. आपण पवार साहेबांना भेटीसाठी गेल्या आठवड्यातच वेळ घेतली होती, अशी माहिती अनिरुद्ध निकम यांनी महाराष्ट्र टाइम्स जवळ बोलताना दिली.
अनिरुद्ध निकम यांनी ऑस्ट्रेलिया येथून हॉर्टिकल्चरमध्ये पदव्युतर पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. जुलै २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाला शिकायला जाताना देखील त्यांनी सहकुटुंब शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते.
कोकणात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाच्या आमदाराच्या चिरंजीवाने शरद पवारांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र ही भेट कोणत्याही स्वरूपाची राजकीय नव्हती, राजकीय घडामोडी झाल्या असत्या किंवा नसत्या, तरी माझी भेटही होणारच होती असेही अनिरुद्ध यांनी स्पष्ट करत या भेटीनंतर सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांवर पडदा टाकला आहे.