राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे- २ सरकार येणार आहे. साहजिकच महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी केला. ३७० कलम रद्द झाल्याचा फायदा देशाला नव्हे तर केवळ भाजपलाच झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
ठाकरे गटाकडून निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याचा आग्रह धरला जात असताना काँग्रेस मात्र निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यास तयार नसल्याचे समजते. अशावेळी राऊत यांनी मात्र पुढील मुख्यमंत्री कोण असणार हेच सांगून टाकले आहे. प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ३७० कलम रद्द करण्याचा फायदा केवळ भाजपला झाला. देशाला कलम ३७० करण्याचा काहीच फायदा झाला नाही. काश्मिरात १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जवान शहीद होत आहेत. अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यात मोदी सरकारला यश आले नाही. नरेंद्र मोदी यांच्याकडे बहुमत नाही, असेही राऊत म्हणाले.
मुंबई शहरातील आणखी एक भूखंड अदानी यांना दिला आहे. कांजूरमार्ग येथील भूखंड दिला जात आहे. एकूण २२ बहुमूल्य भूखंड महायुती सरकारकडून अदानी यांना दिले जात आहेत. हे सरकार तीन गँगचे मिळून बनलेले सरकार आहे. पूर्वी लँड माफिया गुंडगिरी करत होते. आता सरकारचे लाडके उद्योगपती यांना भूखंड दिले जात आहे. असे असले तरी शिवसेना धारावी प्रकल्पाची एकही विट रचू देणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला. मंत्रिमंडळ बैठकीत जे वाद होत आहेत ते पाहता सरकारमध्ये गँगवार पेटले आहे. सरकारमधील शिंदे आणि फडणवीस गँगमधील हे वाद आहेत असेही ते म्हणाले.
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागले आहे. सरकारकडून दिलेले पैसे कोणाच्या खिशातील पैसे नाहीत. त्यामुळे लोकांनी त्या पैशांचा लाभ घ्यावा. परंतु मतांसाठी निर्माण केलेली ही योजना बंद होणार आहे. काही दिवसांत सरकारच्या या सर्व योजना बंद करण्यात येतील. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर नव्या स्वरुपात या योजना आणल्या जातील. ठाकरे २ सरकार येणार आहे, असेही ते म्हणाले.