आज कोल्हापुरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरी केले जात आहे. एकमेकांना जिलेबी भरून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असतानाच महावीर कॉलेजच्या बाजूला असलेल्या एका रस्त्याच्या कडेला गुणिले आकाराचे दोन खांब एकमेकांसमोर उभे केलेले आणि त्याला जोडणारा एक दणकट दोरखंड बांधलेला दिसला. जमिनीपासून तब्बल पाच ते सहा फूट उंचीवर दोरीवर डोंबाराची 10 वर्षाची काजल नावाची मुलगी हातात काठी पकडून आणि एका हातात झेंडा पकडून एक टोक ते दुसरे टोक आपले तोल सांभाळत कवायतीचे प्रकार करून दाखवत होती. खाली देशभक्तीपर गाणे लावण्यात आले होते आणि या रस्त्यावरून येणारे जाणारे नागरिक हे सर्व पाहून बाजूला ठेवलेल्या ताटात मनाला येईल तितके 10, 50, 100 रुपये टाकायचे. तर काही जण त्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त जिलेबी देऊन पुढे मार्गस्थ व्हायचे मात्र पुढे जाताना हे सर्व चित्र पाहून हळहळ व्यक्त करत होते. देशाच्या अमृत महोत्सव काळात देखील अद्याप गरिबी हटलेली नाही याचे स्पष्ट उदाहरण या डोंबाराच्या माध्यमातून दिसून येत होत.
आम्ही या डोंबाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी या डोंबाऱ्यांनी आपली व्यथा मांडत सरकारवर आणि आपल्या नशिबावर खापर फोडले. शिक्षण नसल्यान आम्हाला कोणीही जवळ करत नाही कोणत्याही योजना मिळत नाहीत. मुलांना शाळेत घालण्यासाठी पैसे नसल्याने आम्हाला असे रस्त्यावर सर्कशीचे प्रयोग करून दाखवावे लागतात. दिवसाला जे पाच सहाशे रुपये मिळतात यातून आमचा एक दिवस निघून जातो. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हेच कऱ्याच असे पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या या व्यवसायात आता आमची ही पिढी देखील काम करत आहे. मुलगी वर दोरखंडावर चढली की ती पडेल या काळजीने आम्ही खालून हालत देखील नाही. सुरुवातीला आम्हाला भीती वाटायची मात्र आता काजल पूर्णपणे या खेळात परिपक्व झाली आहे असे तिचे नातेवाईक सांगतात.
काजल कधी ताटावर बसून दोरखंडावर चालते तर कधी सायकलची रीम घेऊन त्यावर चालते. एका टोका पासून ते दुसऱ्या टोकापर्यंत यायला काजलला साधारण 15 ते 20 मिनिट लागतात. या संपूर्ण वेळेत ती एका बांबूच्या मदतीने आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करून स्वतःला सांभाळत असते. या संदर्भात काजल ला विचारले असता काजल म्हणाली, शिकायची इच्छा असली तरी आम्ही गरीब आहोत. आमच्याकडे पैसे नाही घर नाही यामुळे आम्हाला हे काम करावं लागतं. तुला मोठे अधिकारी व्हायची इच्छा होत नाही का विचारले असता तिचे डोळेच पाणवले आणि ती शांत झाली.
देशाच्या या अमृत महोत्सव काळात अनेक मुलींना मोफत शिक्षण पासून ते जन्मलेल्या मुलीला मिळणारे पैसे असे अनेक योजना सरकार या गरीब लोकांसाठी आणत आहे. मात्र त्याच्यासाठी लावण्यात आलेल्या कागदपत्रांच्या अटीशर्ती मध्ये हे बसत नसल्याने यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.शिवाय योजना जाहीर झाल्या की त्यात येणारे 100 वाटेकरी देखील काही वेळा कारणीभूत ठरतात.