ही बाब पोलीस पाटील यांनी पोलिसांनाही कळवले. मात्र रात्र झाल्याने काही दिसून आले नाही. त्यामुळे सर्व परत आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पुन्हा सर्वजण त्या ठिकाणी गेले असता मोगी चंदू पाडवी (वय ३३) हीचा मृतदेह झाडाच्या फांदीस ओढणीने गळफास घेऊन ती लटलेल्या अवस्थेत दिसुन आली. तनुष चंदु पाडवी (वय ५) हा सुमारे ५०० मिटर अंतरावर नदीच्या पाण्यात मृत अवस्थेत दिसला. शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालय मोलगी येथे मृतदेह नेण्यात आले. मात्र मृत महिलेल्या माहेरच्या मंडळींनी तिने आत्महत्या केली नसून घातपाताचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी मोलगी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. अखेर आई आणि बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. १४ ऑगस्ट रोजी शवविच्छेदन करून मृतदेह सासरच्या मंडळींच्या ताब्यात देण्यात आला.
दोन दिवसांपासून मृतदेह मिठात पुरला
मोगी चंदू पाडवी हीचा मृतदेह झाडाच्या फांदीस ओढणीने गळफास घेऊन ती लटलेल्या अवस्थेत दिसून आली. तर बालक तनुष चंदू पाडवी हा सदर ठिकाणाहून सुमारे ५०० मिटर अंतरावर नदीत मृत अवस्थेत दिसून आला. सदर महिलेने आत्महत्या केली नसून घातपाताचा संशय मृत महिलेच्या माहेरच्यांनी केला असून याबाबत आम्ही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मोलगी पोलीस ठाण्यात गेलो. मात्र, आमचे ऐकले गेले नाही आणि शवविच्छेदनासाठी नंदुरबार येथे पाठवण्यात आले. आम्हाला न्याय हवा आहे. याघटनेत जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे असे मृत महिलेचे काका धिरसिंग रामा वसावे यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृत महिलेचे सासर असलेल्या साकली उमरचा लोहारपाडा येथे आई आणि बालकाचा मृतदेह दोन दिवसांपासून मिठात पुरून ठेवला आहे.
अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई
मोलगी पोलीस ठाण्यात सदर महिला व बालकाच्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढे योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी सांगितले. याबाबत पोलीस काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.