काय आहे प्रकरण?
खारघरमध्ये राहणाऱ्या ६० वर्षीय बांधकाम व्यावसायिकाला जानेवारी महिन्यात सायबर टोळीने इलाना शर्मा या नावाने संपर्क साधला होता. तसेच, शेअर मार्केटमधून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्याला होकार दिल्यानंतर सायबर टोळीने त्यांना एक लिंक पाठवून कंट्री ग्लोबल गोल्ड कॅपिटल या कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यास सांगितले. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकाने या लिंकद्वारे पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. त्यानंतर सायबर टोळीने प्रज्ञा बंग नावाची महिला असल्याचे भासवून या बांधकाम व्यावसायिकाला संपर्क साधून तिच्या कंपनीमार्फतही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास त्यांना भाग पाडले. त्यांना एका कंपनीमध्ये दोन कोटी ५ लाख रुपये व दुसऱ्या कंपनीमध्ये १ कोटी ९० लाख रुपये फायदा झाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे या व्यावसायिकाने हे पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना विविध कर भरण्यास सांगण्यात आले.
त्यानुसार या बांधकाम व्यावसायिकाने गुंतवणूक केलेली रक्कम व त्यावर झालेल्या फायद्याचे पैसे काढून घेण्यासाठी सायबर टोळीने सांगितल्यानुसार तब्बल १३ कोटी ५८ लाख ६३ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर पाठवून दिले. मात्र त्यानंतरही त्यांना पैसे काढता आले नाहीत. अखेर स्वतःची फसवणूक होत असल्याचे बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
दुसरी घटना: नवऱ्याच्या व्यसनमुक्तीसाठी दागिने गमावले
मुंबई : ‘काही मिळवायचे असेल तर काही गमवावे लागते’, असे म्हटले जाते. हाच विचार करून गोवंडी येथील महिलेने पतीचे दारुचे व्यसन सोडविण्यासाठी आणि मुलास नोकरी लागावी याकरिता स्वत:चे दागिने बुवाबाजी करणाऱ्या महिलांना दिले. मात्र ना नवऱ्याचे व्यसन सुटले ना, मुलाला नोकरी नाही. मात्र या प्रयत्नात स्वत:चे दागिने मात्र या महिलेने गमावले. या महिलेने गोवंडी पोलिस ठाण्यात तक्रार केली.